नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर.
तळोदा तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी आहे. तळोदा बसस्थानकाच्या ताफ्यात पाच नव्या अत्याधुनिक राजमाता जिजाऊ लक्झरी बसेस दाखल झाल्या आहेत. आमदार राजेश पाडवी यांच्या विशेष प्रयत्नातून आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे तळोदेकरांना ही भेट मिळाली आहे.
आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते या नव्या बसेसचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
ग्रामीण प्रवाशांच्या सोयीसाठी पाठपुरावा
ग्रामीण भागातील प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार परिवहन सेवा मिळावी, तसेच प्रवासातील गैरसोय दूर व्हावी, या उद्देशाने आमदार राजेश पाडवी यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे तळोदा आगारासाठी नव्या बसेसची मागणी केली होती. या मागणीसाठी त्यांनी मंत्रालय स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला आणि अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले.
या नव्या बसेसमध्ये काय आहे खास?
या राजमाता जिजाऊ लक्झरी बसेस आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहेत.
• प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तब्बल १२ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सुविधा
• आरामदायी प्रवासासाठी पुढील बाजूस शॉकअप आणि मागील बाजूस सस्पेन्शनची सुविधा
• प्रवाशांना सूचना देण्यासाठी माईकची व्यवस्था
या सुविधांमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे.
लोकार्पण सोहळ्यानंतर आमदार राजेश पाडवी यांनी कार्यकर्ते आणि मान्यवरांसह या नव्या बसमधून सुमारे चार किलोमीटर प्रवास करत बसेसच्या सुविधांची पाहणी केली.
या मान्यवरांची होती उपस्थिती
या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष अजय परदेसी, तळोदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजन मोरे, विधानसभा प्रभारी नारायण ठाकरे, नगरसेवक शिरीष माळी, सुभाष चौधरी, ज्येष्ठ नेते प्रा. विलास डामरे, श्याम राजपूत, प्रकाश कलाल, सुभाष जैन, प्रकाश वळवी, योगेश मराठे, पंकज तांबोळी, संजय कलाल, सुभाष मराठे, कल्लू अन्सारी, योगेश गुरव, किरण सूर्यवंशी, चेतन शर्मा, प्रकाश शर्मा, सरपंच मोग्या पाडवी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
तसेच आगार व्यवस्थापक किशोर अहिरराव, वाहतूक अधीक्षक अजिंक्य नाटकर, अक्कलकुवा आगार कामगार संघटनेचे अध्यक्ष शकील पिंजारी, सचिव गणेश मराठे, वाहतूक नियंत्रक वंदना गोसावी, वाहक मनोज खैरनार, मनोज भारती, दीपक पाडवी, संदीप वाघ, मनोज वाघ, प्रवासी नागरिक, भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
