विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.

भुसावळ : येथील प्राथमिक शिक्षकांच्या नूतन सहकारी पतपेढीत सभासदांच्या नावावर बनावट कर्जप्रकरणे उभी करून १ कोटी ९३ लाख ८६ हजार २५० रुपयांचा अपहार झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी दोन निलंबित कर्मचाऱ्यांसह सात जणांविरुद्ध भुसावळ शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास आता जळगावच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ सप्टेंबर २०२३ ते ३ मे २०२५ या कालावधीत हा गैरव्यवहार झाला. पतपेढीत चिटणीस, हिशोबनीस आणि लिपिक म्हणून काम करणारे राजू लालू गायकवाड व अभिजीत दत्तात्रय तायडे यांनी संगनमताने बनावट कागदपत्रे तयार केल्याचा आरोप आहे. दोघांनाही सध्या सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

या दोघांनी ९८ सभासदांच्या नावाने कर्ज प्रकरणे तयार केली. त्यावर सभासदांच्या बनावट स्वाक्षऱ्या केल्या आणि मंजूर रक्कम सभासदांच्या खात्याऐवजी इतरांच्या बँक खात्यात वळवल्याचा ठपका फिर्यादीत ठेवण्यात आला आहे. यासाठी एकूण पाच बँक खात्यांचा वापर झाल्याचे तपासात समोर आले आहे.

फिर्यादीत नमूद केलेल्या आकडेवारीनुसार, नीलेश रवींद्र महाजन यांच्या खात्यात ८९ लाख ९२ हजार आणि ६७ लाख ८५ हजार ६०० रुपये, हर्षल सुनील गावंडे यांच्या खात्यात १९ लाख ४२ हजार, रुपाली अभिजीत तायडे यांच्या खात्यात ६ लाख ४५ हजार ६००, हर्षल रवींद्र चौधरी यांच्या खात्यात ४ लाख ३८ हजार ५०, तर कुणाल संजय महाजन यांच्या खात्यात ५८ हजार ३०० रुपये वळवण्यात आल्याचा आरोप आहे.

सतीश दिंडोरी (रा. दिंडोरी, जि. नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंगळवारी गुन्हा नोंदवण्यात आला. बुधवारी हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला.

बनावट कर्ज प्रकरणांच्या माध्यमातून नेमकी किती रक्कम कुठे वळवली गेली, यात आणखी कुणाचा सहभाग आहे का आणि ही रक्कम कुठे वापरली गेली, याचा सखोल तपास आर्थिक गुन्हे शाखा करणार आहे. या प्रकरणामुळे पतपेढीच्या कारभारातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मात्र, दाखल झालेल्या गुन्ह्यातील आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत, हे तपासातून स्पष्ट होईल.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!