मुंबई : केंद्र सरकारच्या 8 व्या केंद्रीय वेतन आयोगाची (8th CPC) महत्त्वाची बैठक येत्या 22-23 ऑक्टोबर 2026 रोजी मुंबईत होणार आहे.
कर्मचारी संघटना, पेन्शनर असोसिएशन, रेल्वे कर्मचारी फेडरेशन आणि इतर भागधारकांशी या दोन दिवसीय दौऱ्यात सविस्तर चर्चा होणार आहे. पगार रचना, पे-मॅट्रिक्स, महागाई भत्ता (DA), महागाई सवलत (DR), घरभाडे भत्ता (HRA) आणि इतर सुविधा यावर आयोग अभिप्राय घेणार आहे.
बैठकीचा अजेंडा काय?
आयोगाने 21 सप्टेंबरच्या निवेदनात मुंबई दौरा जाहीर केला होता. या बैठकीत विशेषतः –
• रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कामाच्या परिस्थिती आणि जोखमी
• पगारवाढीसाठीची मागणी असलेला फिटमेंट फॅक्टर
• पेन्शन आणि वार्षिक वेतनवाढ
यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत काय झाले?
8 व्या वेतन आयोगाची स्थापना 3 नोव्हेंबर 2025 रोजी झाली असून आयोगाला शिफारसी सादर करण्यासाठी 18 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. आयोगाने बंगळुरू येथे 7-8 ऑक्टोबर रोजी बैठका घेतल्या असून, त्यानंतरचा थांबा मुंबई आहे.
या मुंबई बैठकीसाठी भागधारकांना 10 ऑक्टोबरपर्यंत अपॉइंटमेंटसाठी अर्ज करण्याची मुदत देण्यात आली होती, जी आता संपली आहे.
केंद्रातील लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे लक्ष आता या मुंबई बैठकीकडे लागले आहे.
