महाराष्ट्र
राज्यात मान्सून परतीच्या वाटेवर असतानाच हवामानाने पुन्हा एकदा डबल गेम खेळला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) आज, सोमवार 19 ऑक्टोबर रोजी राज्यात जोरदार पावसाचा इशारा दिला असून अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.
आज कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि पूर्व विदर्भात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळणार आहे.
या जिल्ह्यांना यलो अलर्ट:
हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहत वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे.
तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूरसह घाटमाथा परिसरात देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे. यासोबतच सोलापूरसह एकूण 14 जिल्ह्यांना यलो अलर्टचा इशारा आहे.
एकूणच कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक येथे मात्र हवामान कोरडे राहून उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे.
नागरिकांना आवाहन:
शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, तर नागरिकांनी विजा चमकत असताना झाडाखाली थांबू नये, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
