कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या आणि संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल आज, सोमवार १९ ऑक्टोबर रोजी जाहीर होत आहे.

काल रविवारी झालेल्या मतदानात विक्रमी ९९.९६% मतदानाची नोंद झाली आहे. एकूण ५,४१८ ठरावधारक मतदारांपैकी ५,४१६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. केवळ २ मतदारांचे मतदान हुकल्याने १२ पैकी ९ तालुक्यांमध्ये १००% मतदान झाले आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले यांनी दिलेल्या माहितीनुसार, मतमोजणीला आज सकाळी ८ वाजल्यापासून कोल्हापुरातील रमणमळा येथील बहुउद्देशीय केंद्रात सुरुवात झाली आहे. या ठिकाणी ३५ टेबलांवर मतमोजणी सुरू असून दुपारी १ वाजेपर्यंत गोकुळची सत्ता कोणाच्या हाती जाणार हे स्पष्ट होणार आहे.

महायुती विरुद्ध सतेज पाटील – प्रतिष्ठेची लढाई

ही निवडणूक महायुतीप्रणीत ‘छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी’ विरुद्ध आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील ‘राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी’ अशी थेट लढत मानली जात आहे.

गोकुळ दूध संघ हा दूध उत्पादक शेतकरी आणि जिल्ह्यातील सहकारासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने या निवडणुकीला विशेष महत्त्व आहे.

क्रॉस व्होटिंगची भीती, निकालावर सट्टा बाजार

अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग होण्याचा धोका वर्तवला जात असून निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सध्या या निकालावर प्रचंड सट्टा आणि बेटिंग लागल्याचे चित्र आहे.

आज दुपारपर्यंत गोकुळवर कुणाचा गुलाल उधळला जाणार आणि कुणाचा बाजार उठणार याचा फैसला होणार आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!