ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला बळ – CEO करिश्मा नायर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याची उल्लेखनीय कामगिरी
जळगाव जिल्हा प्रतिनिधी, जितेंद्र पाटील
महाराष्ट्र शासनाच्या सेवा संकल्प अभियानाच्या विशेष कालावधीत जळगाव जिल्हा परिषदेच्या ‘उमेद’ – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाने दमदार कामगिरी करून दाखवली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी २,३७९ स्वयंसहाय्यता गटांना एकूण १२४ कोटी ८७ लाख ८९ हजार रुपयांचे बँक कर्ज वितरित करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे आणि जिल्हा अभियान व्यवस्थापक हरेश्वर भोई यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा व तालुका स्तरावरील पथकाने बँक प्रशासनाशी प्रभावी समन्वय साधत हे यश मिळवले आहे.
१९० कोटींच्या उद्दिष्टाकडे वेगवान वाटचाल
या अभियान कालावधीसाठी जिल्ह्याला ४,७५० लाभार्थ्यांचे भौतिक उद्दिष्ट आणि १९० कोटी रुपयांचे आर्थिक उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यासाठी एकूण २,४३१ कर्जप्रस्ताव बँकांकडे सादर करण्यात आले, त्यापैकी २,३७९ प्रस्ताव मंजूर होऊन प्रत्यक्ष कर्जवाटप झाले. या कर्जाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना शेतीपूरक व्यवसाय, दुग्धव्यवसाय, शेळीपालन, कुटीरोद्योग, शिलाईकाम आणि विविध लघुउद्योग सुरू करण्यासाठी मोठे आर्थिक पाठबळ मिळाले आहे.
चोपडा तालुका आघाडीवर, जामनेरचा विक्रमी सहभाग
तालुकानिहाय कामगिरीत चोपडा तालुका १७० लाभार्थ्यांना १२ कोटी ८५ लाख ४५ हजार रुपयांचे कर्जवाटप करून अव्वल ठरला आहे.
• रावेर: १५२ लाभार्थ्यांना ११.१० कोटी
• पाचोरा: १९८ लाभार्थ्यांना ११.०८ कोटी
• जामनेर: २७४ लाभार्थ्यांना ११.०१ कोटी (सर्वाधिक लाभार्थी)
• जळगाव: २३० लाभार्थ्यांना १०.०४ कोटी
• पारोळा: १९८ लाभार्थ्यांना ९.२३ कोटी
• चाळीसगाव: १३३ लाभार्थ्यांना ९.०७ कोटी
• अमळनेर: २३० लाभार्थ्यांना ९.०१ कोटी
• भडगाव: १३९ लाभार्थ्यांना ८.२० कोटी
याव्यतिरिक्त यावल, बोदवड, धरणगाव, भुसावळ, एरंडोल आणि मुक्ताईनगर तालुक्यांमध्येही लाखो रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे.
गावागावात जाऊन जनजागृती, समन्वयातून यश
जिल्हा अभियान व्यवस्थापक, सर्व तालुका अभियान व्यवस्थापक (BMM), प्रभाग समन्वयक (CC) यांनी गावागावात जाऊन बचत गटांच्या बैठका घेतल्या, महिलांना बँक कर्जप्रक्रियेचे मार्गदर्शन केले आणि कागदपत्र पूर्ततेपासून मंजुरीपर्यंत पाठपुरावा केला.
कोट – ग्रामीण महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला प्राधान्य
“ग्रामीण भागातील महिलांमध्ये उद्योजकतेची मोठी क्षमता आहे. स्वयंसहाय्यता गटांच्या माध्यमातून महिलांना बँक कर्ज उपलब्ध करून देणे, त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करणे हे आमचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यास ग्रामीण कुटुंबांचे स्थैर्य वाढेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल,” – करिश्मा नायर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. जळगाव.
या यशस्वी वाटपामुळे ग्रामीण महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी मिळाली असून जळगाव जिल्हा महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरला आहे.
