विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.

समृद्धी, मुंबई-पुणे आणि मुंबई-गोवा महामार्गावर प्राधान्याने सेवा, ट्रॉमा केअर सेंटरशी जोडणार समन्वय

मुंबई : महामार्गावरील अपघातातील मृत्यूचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. गंभीर अपघातातील जखमींना वेळेत उपचार मिळावेत यासाठी ‘हवाई रुग्णवाहिका’ सेवा सुरू करण्याचे नियोजन असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी केली.

अपघातानंतरचा पहिला तास म्हणजे ‘गोल्डन अवर’ अत्यंत महत्त्वाचा असतो. या काळात उपचार मिळाल्यास अनेकांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे जखमींना तात्काळ ट्रॉमा केअर सेंटरपर्यंत पोहोचवण्यासाठी हवाई रुग्णवाहिका उपयुक्त ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि मुंबई-गोवा महामार्ग या अपघातप्रवण मार्गांवर ही सेवा प्राधान्याने सुरू केली जाणार आहे. यासाठी स्वतंत्र आपत्कालीन यंत्रणा, हवाई सेवेची कार्यपद्धती आणि संबंधित विभागांमध्ये समन्वय साधण्यावर भर दिला जाणार आहे.

आधुनिक तंत्रज्ञान आणि जलद आपत्कालीन आरोग्य सेवेच्या बळावर रस्ते अपघातातील मृत्युदर कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न असून, एअर अ‍ॅम्ब्युलन्सच्या नियोजनामुळे महामार्गावरील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम होईल, असा विश्वास परिवहन मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केला.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!