जळगांव प्रतिनिधी, महेश माळी.
शिक्षण प्रसारक मंडळ संचालित सौ. सु. ग. देवकर प्रायमरी स्कूल येथे शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीच्या अनुषंगाने परिवहन समितीची महत्त्वपूर्ण सभा उत्साहात संपन्न झाली.

या सभेच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका तथा परिवहन समितीच्या अध्यक्षा सौ. सुषमा साळुंखे होत्या. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मोटार वाहन उपनिरीक्षक, जळगाव अश्विनी जोगदंड, माजी नगरसेविका सौ. मंगला चौधरी, वीर सावरकर रिक्षा युनियनचे अध्यक्ष श्री. दिलीपभाऊ सपकाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी मोटार वाहन उपनिरीक्षक अश्विनी जोगदंड यांनी उपस्थित रिक्षा चालक व मालकांना सविस्तर मार्गदर्शन केले. शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करताना क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसवू नयेत, वाहनांची कागदपत्रे अद्यावत ठेवावीत, वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळावेत, तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
वीर सावरकर रिक्षा युनियनचे अध्यक्ष दिलीपभाऊ सपकाळे यांनी रिक्षाचालकांच्या समस्या व अडचणी मांडताना, विद्यार्थी सुरक्षित वाहतूक ही आपली नैतिक जबाबदारी असल्याचे सांगितले. पालकांचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी सर्व रिक्षाचालकांनी एकजुटीने नियमांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रशांत साखरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. किशोर सोनवणे यांनी केले. ही सभा यशस्वी करण्यासाठी पालक शिक्षक संघाच्या चिटणीस सौ. शितल वारुळकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
या सभेला परिसरातील रिक्षाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
