नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर.

आगामी सण आणि उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप यांनी दिले होते. त्याच अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने धडगाव तालुक्यात मोठी कारवाई करत तब्बल 1 कोटी 11 लाख 15 हजार रुपये किमतीचा 262 किलो गांजा जप्त केला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 06/10/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. हेमंत पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, धडगाव पोलीस ठाणे हद्दीतील मांडवी गावाच्या शेत शिवारातील रगमानपाडा येथे एका इसमाने स्वतःच्या शेतात स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीररित्या मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणाऱ्या गुंगीकारक गांजा या वनस्पतीची लागवड करून त्याची जोपासना करत आहे.

माहिती मिळताच पो.नि. हेमंत पाटील यांनी तात्काळ एक पथक तयार करून कारवाईचे आदेश दिले.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडगाव पोलिसांच्या मदतीने मांडवी बु. येथील शेत शिवारात वनपट्ट्यामध्ये पाहणी केली असता, तेथे गांजाची झाडे आढळून आली. सदर ठिकाणाहून पोलिसांनी 262 किलो गांजाची झाडे जप्त केली आहेत.

सदर आरोपीचे नाव पिंटू उर्फ पिढ्या मिठ्या पाटले रा. मांडवी बु. रगमानपाडा ता. धडगाव जि. नंदुरबार असे असून त्याने वनजमिनीमध्ये बेकायदेशीररित्या गांजाच्या झाडांची लागवड करून संवर्धन व जोपासना केल्याचे उघडकीस आले आहे. जप्त केलेल्या गांजाची झाडे गुन्ह्याच्या पुढील तपासकामी योग्य ती कायदेशीर प्रक्रिया करून ताब्यात घेण्यात आली आहे.

या प्रकरणी आरोपी पिंटू उर्फ पिढ्या पाटले याच्या विरोधात धडगाव पोलीस ठाणे येथे गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम-1985 च्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक श्री. आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. हेमंत पाटील, पो.उप निरीक्षक मुकेश पवार, विकास गांगुर्डे, महेश निकम, पो. हवालदार दिनेश चित्ते, स्वप्नील गोसावी, मुकेश तावडे, सुनिल वेलवे, सचिन वसावे, पोलीस अंमलदार मनोज महाजन, अभय राजपूत, निशीकांत गवळे, हेमंत बारी, विनोद पाटील, राहुल पांढरकर यांच्या पथकाने केली.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!