चोपडा प्रतिनिधी – चोपडा शहरातील नारायणवाडी परिसर, धरणगाव नाका जवळ एक धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी घटना उघडकीस आली आहे. ४५ वर्षीय प्रौढाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आला असून या घटनेने संपूर्ण चोपडा शहर हादरून गेले आहे.
मृत व्यक्तीचे नाव प्रदीप राजू माळी (वय ४५, रा. तारामती नगर, चोपडा) असे आहे.
लग्नपत्रिकेवरून पटली ओळख –
सकाळच्या सुमारास स्थानिक नागरिकांना धरणगाव नाका परिसरात एका निर्जन ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळला. चेहरा दगडाने पूर्णपणे ठेचल्याने ओळख पटणे कठीण झाले होते. घटनास्थळी मृताच्या खिशात सापडलेल्या एका लग्नपत्रिकेवरून त्याची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. या पत्रिकेच्या आधारे पोलिसांनी तात्काळ तारामती नगर येथील नातेवाईकांशी संपर्क साधला.
घटनेची माहिती मिळताच चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
पूर्ववैमनस्यातून खूनाचा संशय –
प्राथमिक माहितीनुसार हा खून अतिशय क्रूरपणे करण्यात आला आहे. हत्येसाठी मोठ्या दगडाचा वापर करण्यात आला आहे. हा खून पूर्ववैमनस्यातून झाला आहे की अन्य काही कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. या परिसरातील CCTV फुटेज तपासण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
या घटनेमुळे नारायणवाडी आणि तारामती नगर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. आरोपीचा तात्काळ शोध घेऊन अटक करण्याची मागणी होत आहे.
याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
