विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.

रावेर : शेतातून चोरीस गेलेली ५ एचपीची विद्युत मोटार विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला रावेर पोलिसांनी जेरबंद केले आहे. या कारवाईत रमजीपूर येथील चौघा संशयितांना अटक करून चोरीचा मोटार पंप जप्त करण्यात आला आहे.

जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी शेती उपयोगी साहित्य आणि कॉपर वायर चोरीला आळा घालण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्याच मोहिमेचा भाग म्हणून रावेर पोलिसांनी गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे ही धडक कारवाई केली.

फिर्यादी मोहन लालचंद कावडकर (रा. रमजीपूर) यांच्या गट क्रमांक १६२२/२ मधील शेतातून ३ ऑक्टोबरच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी ‘समुराई’ कंपनीची ५ एचपी क्षमतेची पाण्याची मोटार चोरून नेली होती. याप्रकरणी ६ ऑक्टोबर रोजी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासासाठी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे विशेष पथक नेमण्यात आले होते. तपास सुरू असताना रमजीपूर गावातीलच काही इसम चोरीची मोटार विकण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेले आरोपी 

राजेंद्र सुधाकर महाजन (वय ३०) ,उमेश प्रकाश धनगर (वय २३), रितेश जगन्नाथ कावडकर (वय २३),आनंदा गोपाळ धनगर (वय २८, सर्व रा. रमजीपूर, ता. रावेर)

पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आणि लपवून ठेवलेला मोटार पंप पोलिसांच्या स्वाधीन केला. आरोपींना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे. या टोळीने यापूर्वी अशाच प्रकारच्या आणखी चोऱ्या केल्या आहेत का, तसेच त्यांना अन्य कोणी साथीदार आहेत का, याचा अधिक तपास बीट अंमलदार सिकंदर तडवी करीत आहेत.

नागरिकांना आवाहन

शहरात किंवा ग्रामीण भागात कोणी संशयास्पदरित्या जुनी मोटार, विद्युत पंप किंवा कॉपर वायरची खरेदी-विक्री करत असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी केले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. संदीप पाटील, सपोनि अमूल बच्छाव, पोहेकॉ सिकंदर तडवी, पोकॉ योगेश पाटील, तसेच गुन्हे शोध पथकातील श्रीकांत चव्हाण, प्रमोद पाटील, विशाल पाटील, सुकेश तडवी आणि विकार शेख यांच्या पथकाने केली.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!