जळगाव जिल्हा प्रतिनिधी – निलेश खैरनार
कडगाव (जि. जळगाव) – मौजे कळगाव गावाजवळील वाघूर नदीत बैलांना पाणी पाजण्यासाठी गेलेले ६० वर्षीय शेतकरी अरुण माधव कोळी हे पाण्याचा अंदाज न आल्याने पाय घसरून नदीत पडले. ही हृदयद्रावक घटना ५ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली होती.
घटनेनंतर गावकऱ्यांनी तात्काळ शोधमोहीम सुरू केली, मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्यांना यश आले नाही. या घटनेची माहिती ५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत जळगाव शहर महानगरपालिका अग्निशमन विभागाला देण्यात आली.
त्यानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे नरवीर रावळ आणि जळगाव महानगरपालिका अग्निशमन विभागाचे अग्निशमन केंद्र अधिकारी भारत बारी यांच्या मार्गदर्शनाखाली शोध व बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले.
झाडांमध्ये अडकलेला आढळला मृतदेह
सोमवारी दिवसभर शोध घेऊनही यश न आल्याने आज मंगळवारी सकाळी पुन्हा अग्निशमन दलाच्या पथकाने रबर बोटीच्या सहाय्याने वाघूर नदीपात्रात कसून शोधमोहीम राबविली. यावेळी नदीच्या पाण्याखाली असलेल्या झाडांच्या जाळ्यात अरुण कोळी अडकलेल्या अवस्थेत आढळून आले. पाण्याखाली झाडांमध्ये अडकल्यामुळे त्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
अखेर अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाने त्यांना नदीपात्रातून बाहेर काढले व तात्काळ रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
शोधकार्य पूर्ण झाल्यानंतर मृतदेह तलाठी, पोलीस पाटील आणि ग्रामस्थांच्या ताब्यात देण्यात आला.
या बचाव मोहिमेत अग्निशमन पथकाचे प्रमुख प्रकाश चव्हाण, देविदास सुरवाडे, प्रदीप धनगर, सौरभ चिकटे, योगेश पाटील, किरण महाजन, महेंद्र कोळी आणि बांभोरी येथील विकास सोनवणे यांनी सहभाग घेतला.
सुमारे २४ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर शोध लागल्याने गावावर शोककळा पसरली आहे.
