जळगांव प्रतिनिधी, महेश पाटील.

जामनेर – जामनेर तहसील कार्यालयातील विविध विभागांच्या कामकाजाबाबत सातत्याने नागरिकांच्या तक्रारी येत असूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रशासनाने तातडीने सुधारणा व ठोस कार्यवाही न केल्यास गुरुवार, दि. ८ ऑक्टोबर २०२६ पासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा सडेतोड इशारा मनसे तालुकाध्यक्ष अशोक कृष्णा पाटील यांनी दिला आहे.

जामनेर तहसील कार्यालयातील दप्तर दिरंगाई, प्रलंबित कामे आणि पारदर्शकतेचा अभाव याबाबत यापूर्वी जिल्हाधिकारी तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अनेकदा निवेदने आणि लेखी तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, नागरिकांना आजही शासकीय कामांसाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. नागरिकांची कामे वेळेत व्हावीत आणि प्रशासन अधिक गतिमान व पारदर्शक व्हावे, हीच आमची प्रमुख मागणी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, नुकतेच तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक प्रवीण गांगुर्डे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईनंतर तहसील कार्यालयाच्या एकूणच कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. केवळ एका प्रकरणापुरती कारवाई न करता संपूर्ण कार्यालयाच्या कामकाजाचे परीक्षण करून नागरिकांच्या सर्व तक्रारींची निष्पक्ष चौकशी करावी, अशी आग्रही मागणी अशोक पाटील यांनी केली आहे.

“तहसील कार्यालयाशी संबंधित प्रलंबित कामे, विविध तक्रारी आणि नागरिकांना येणाऱ्या अडचणींची प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी. चौकश्या, कारवाया आणि प्रशासकीय परिवर्तन कधी होणार?” असा थेट सवाल पाटील यांनी प्रशासनाला केला आहे.

प्रशासनाने या मागण्यांची दखल घेऊन ठोस कार्यवाही न केल्यास ८ ऑक्टोबरपासून जामनेर तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण अटळ असल्याचा इशारा मनसेने दिल्याने तहसील प्रशासनाची चांगलीच कोंडी झाली आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!