घनसावंगी, जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार.
आजच्या आधुनिक युगातही मृत्यूनंतर होणारे अवास्तव खर्च, तिसरा, दहावा आणि तेराव्याचे जेवणावळी यासारख्या रुढी-परंपरांना मोठी मान्यता दिली जाते. मात्र या सर्व प्रथांना छेद देत जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातून एक पुरोगामी आणि समाजासमोर आदर्श ठेवणारी घटना समोर आली आहे.
घनसावंगी तालुक्यातील यावलपिंपरी तांडा येथील पवार कुटुंबाने आपल्या आजीच्या निधनानंतर कोणताही पारंपरिक विधी न करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला. ओम, सोम आणि गोरखनाथ चेंडुनाईक पवार या तीन भावंडांनी आपल्या आईच्या आजीच्या निधनानंतर तिसऱ्या दिवशी शेतात ‘चिक्कूचे झाड’ लावून आपल्या आजीला अनोखी आणि पर्यावरणपूरक श्रद्धांजली वाहिली.
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे धडाकेबाज आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आपल्या मातोश्रींच्या निधनानंतर सर्व कर्मकांड आणि अनावश्यक खर्च टाळून वडाचे झाड लावले होते. त्यांच्या याच पुरोगामी आणि विवेकवादी विचारातून प्रेरणा घेत पवार कुटुंबाने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या प्रथा बंद केल्याने सुरुवातीला गावात काही जणांनी टीका केली, उलट-सुलट चर्चा केली. मात्र पवार कुटुंब आपल्या निर्णयावर ठाम राहिले. आजीच्या आठवणीत लावलेले हे झाड वर्षानुवर्षे सावली आणि फळे देईल, तिची आठवण जिवंत ठेवेल, हा विचार त्यामागे होता.
खर्चिक मृत्युभोजापेक्षा झाड लावून पर्यावरणाचे संवर्धन करणे अधिक पुण्याचे काम आहे, हे या कुटुंबाने कृतीतून दाखवून दिले आहे. या कुटुंबाच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून हा आदर्श संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
