जळगाव जिल्हा प्रतिनिधी – निलेश खैरनार
मुंबई, दि. ४ ऑक्टोबर २०२६ – विशेष वृत्तांत
लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी आज मुंबईत सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते आणि हजारो जनतेच्या उपस्थितीत अभूतपूर्व असा विशाल ‘गर्जना’ मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला संबोधित करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधारी आणि निवडणूक आयोगावर जोरदार टीकास्त्र सोडले.

मोर्चाला संबोधित करताना राज ठाकरे म्हणाले, २०१७ पासूनच मी सांगतोय चोरी सुरू आहे –
“२०१७-२०१८ पासून मी तुम्हाला सांगत आलोय, यामध्ये चोऱ्या सुरू आहेत. त्यावेळी मी ममता बॅनर्जी, सोनिया गांधींसह अनेक नेत्यांना भेटून सांगितलं होतं, निवडणुकांवर बहिष्कार टाका, त्याशिवाय दूध का दूध, पाणी का पाणी होणार नाही! मी तेव्हा काय सांगत होतो ते सगळ्यांना आत्ता समजायला लागलंय.”
४० ते ६० लाख मतदार अचानक वाढले कसे?
“२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण बहुमत महायुतीला मिळाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात सन्नाटा होता, हा कोणता विजय? २०२४ लोकसभेनंतर आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात ४० ते ६० लाख मतदार वाढवले गेले. असे कसे मतदार वाढले? लोकसभेला भाजपला २ कोटी ४४ लाख २७ हजार मतं मिळाली, तर ६ महिन्यांनी झालेल्या विधानसभेला ३ कोटी १६ लाख १६ हजार मतं मिळाली. हा फरक कसा?”

सत्ताधाऱ्यांना थेट इशारा –
यावेळी त्यांनी सत्ताधारी पक्षाला उद्देशून म्हटले की, “तुम्ही सत्तेवर बसलात म्हणून आम्हाला राग नाही, तुम्ही सत्ता कशी राबवताय याबाबत आम्हाला राग आहे. कोणाला सत्तेत बसवायचं आणि कोणाला विरोधात बसवायचं हे या देशातील लोकांनी ठरवायचं, निवडणूक आयोगाने नाही. कोणताही पक्ष सत्तेत आला की त्याला सत्ता जाण्याची भीती असते, पण अशी कोणतीही भीती आज राज्य किंवा केंद्र सरकारमध्ये दिसत नाही.”
तसेच ते म्हणाले, “आपण घेतलेला चुकीचा निर्णय आणि चुकीचं धोरण भविष्यात चुकीचा पायंडा पाडणार का, याचा विचार प्रत्येक राजकीय पक्षाने केला पाहिजे. आज सर्व विरोधी पक्ष एका व्यासपीठावर आहेत. जे सत्तेतले पक्ष आज व्यासपीठावर नाहीत, त्यांनीही विचार करावा, उद्या जेव्हा तुम्ही सत्तेतून जाल आणि आज तुम्ही जे करताय ते दामदुपटीने तुम्हाला भोगावं लागेल तेव्हा काय कराल?”

प्रमुख मागण्या –
१. महाराष्ट्रात आजपर्यंत झालेली संपूर्ण SIR प्रक्रिया रद्द झाली पाहिजे.
२. SIR मधून २ कोटी लोकांना बाहेर काढले आहे, हे २ कोटी लोक कोण आहेत? दिल्लीत चर्चा होईल तेव्हा SIR रद्द करण्याची मागणी सर्व पक्षांनी करावी.
३. यापुढील सर्व निवडणुका EVM मशीनऐवजी बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजेत.
या मोर्चामुळे मुंबईत राजकीय वातावरण चांगलेच तापले असून निवडणूक प्रक्रियेवरून पुन्हा एकदा मोठा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
