मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे.
घनसावंगी तालुक्यातील सरफ गव्हाण (सरफवाडी) येथे रेशम विभागांतर्गत तुती लागवड योजनेच्या मस्टरवर सही करण्यासाठी संबंधित कृषी सहाय्यकाने पैशांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेतकरी तथा भाजपा किसान मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष प्रकाश रंगनाथ म्हस्के यांनी कृषी सहाय्यक दत्ता कदम यांच्यावर प्रत्येक मस्टरच्या सहीसाठी प्रति मस्टर तीन हजार रुपयांची लाच मागितल्याचा थेट आरोप केला आहे.
लाच न दिल्याने मस्टर केले ‘झिरो’; शेतकरी लाभापासून वंचित
प्रकाश म्हस्के यांनी सन २०२४-२५ मध्ये आपल्या शेतात रेशम विभागाच्या योजनेनुसार तुती लागवड केली होती. नियमानुसार या योजनेतील मस्टर व एम बी (M.B.) तयार करण्यासाठी संबंधित कृषी सहाय्यकाची स्वाक्षरी आवश्यक असते. मात्र, संबंधित कृषी सहाय्यकाने प्रत्येक मस्टरवर सही करण्यासाठी ३ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. परिस्थिती नाजूक असल्याने पैसे देण्यास असमर्थता दर्शवल्यामुळे कृषी सहाय्यकाने म्हस्के यांचे तब्बल ६ मस्टर ‘झिरो’ (शून्य) दाखवून रद्द केले, ज्यामुळे त्यांना योजनेचा कोणताही आर्थिक लाभ मिळू शकला नाही, असे म्हस्के यांनी म्हटले आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल
या अन्यायाविरोधात प्रकाश म्हस्के यांनी ३१ ऑगस्ट २०२६ रोजी विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे अधिकृत लेखी तक्रार नोंदवली आहे. संबंधित कृषी सहाय्यकाची तात्काळ सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी या अर्जाद्वारे केली आहे. या तक्रारीच्या प्रती स्थानिक आमदार बबनराव लोणीकर, जालना जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक, उपविभाग कृषी अधिकारी (परतूर), उपविभागीय अधिकारी (अंबड), तहसीलदार (घनसावंगी), तालुका कृषी अधिकारी आणि घनसावंगी पोलीस निरीक्षकांसह प्रसारमाध्यमांना देण्यात आल्या आहेत.
लाचखोरीच्या या प्रकारामुळे शेतकरी वर्गामध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली आहे. थेट सत्ताधारी पक्षाच्या किसान मोर्चा पदाधिकाऱ्याकडूनच उघडपणे लाचेची मागणी होत असेल, तर सामान्य शेतकऱ्यांचे काय हाल होत असतील, असा संतप्त सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
