विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.

नाशिक विभागात ८४१ बोगस आयडी, ७५ टक्के घोटाळा एकट्या जळगावात; ११ विशेष पथकांची संशयित शाळांवर धाड, शिक्षण माफियांचे धाबे दणाणले

नाशिक – शिक्षणाच्या पवित्र क्षेत्राला काळिमा फासत बोगस शालार्थ आयडीच्या आधारे शासनाच्या तिजोरीतून तब्बल १६० कोटी रुपये लुटणाऱ्या सिंडिकेटचा पर्दाफाश करण्यासाठी नाशिक शहर पोलिसांनी ‘मिशन सर्जिकल स्ट्राइक’ हाती घेतले आहे.

नाशिक विभागातील नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांतील संशयित शाळांवर पोलिसांच्या ११ विशेष पथकांनी लॅपटॉप, प्रिंटर आणि कॅमेऱ्यांसह अचानक छापे टाकले आहेत. या धाडसत्रामुळे बोगस शिक्षक, संस्थाचालक आणि शिक्षण माफियामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

या घोटाळ्याचे एपिसेंटर जळगाव जिल्हा ठरला आहे. विभागात आढळलेल्या एकूण ८४१ बोगस शालार्थ आयडींपैकी तब्बल ६३८ आयडी, म्हणजेच ७५.८६ टक्के आयडी एकट्या जळगाव जिल्ह्यातील आहेत. ही गंभीर बाब लक्षात घेऊन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी ५ विशेष पथके केवळ जळगाव जिल्ह्यासाठी तैनात केली आहेत. पोलिसांची धाड सुरू होताच जळगावात संशयितांची पळापळ सुरू झाली असून, या कारवाईवरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना देखील सुरुवात झाली आहे.

पोलिसांची ही कारवाई अत्यंत गोपनीय आणि नियोजनबद्ध पद्धतीने सुरू आहे. साध्या वेशातील पोलिस पथके थेट शाळांमध्ये धडक देत आहेत. शाळांचे हजेरी मस्टर, जुनी वेतन देयके, मूळ नियुक्तीपत्रे आणि आवक-जावक नोंदवह्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.

डिजिटल पुरावे गोळा करण्यावर भर

केवळ कागदपत्रे जप्त करून न थांबता, बनावट कागदपत्रे कोठे आणि कशा प्रकारे तयार करण्यात आली, याचे डिजिटल पुरावे गोळा करण्यावर पोलिसांचा भर आहे. त्यासाठी जागीच लॅपटॉप आणि प्रिंटरच्या मदतीने पंचनामे करण्यात येत आहेत.

या प्रकरणी मार्च २०२५ मध्ये नाशिकरोड पोलीस ठाण्यात तत्कालीन शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात मनोज पाटील, निलेश पाटील, दत्तात्रय पाटील, तत्कालीन उपसंचालक नितीन उपासनी आणि स्वतः फिर्यादी भाऊसाहेब चव्हाण यांच्यासह तब्बल १२८ जण संशयित म्हणून आहेत.

१२६ जणांचा फौजफाटा, १२०० संशयित निष्पन्न

या तपासासाठी उपायुक्त किरणकुमार चव्हाण, गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त संदीप मिटके, सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन बारी यांच्या नेतृत्वाखाली ४६ अधिकारी आणि ८० हून अधिक अंमलदार रात्रंदिवस काम करत आहेत. नाशिकरोड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दोन गुन्ह्यांच्या तपासात आतापर्यंत १,२०० हून अधिक संशयित निष्पन्न झाले आहेत.

आठ मुख्य सूत्रधारांना बेड्या

या घोटाळ्यातील आठ मुख्य सूत्रधारांना पोलिसांनी यापूर्वीच बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये माजी शिक्षण उपसंचालक, शिक्षण मंडळाचे निवृत्त अध्यक्ष नितीन उपासनी, भाजप पदाधिकारी संजय गरूड, दीपक गरूड, शशिकांत हिंगोणेकर, तुषार साळुंके, किरण पाटील, राहुल पवार आणि प्रशांत वाडीले यांचा समावेश आहे.

तपासाचा धागा आता उच्च पदस्थ अधिकारी आणि बड्या संस्थाचालकांपर्यंत पोहोचला असून, येत्या २४ ते ४८ तासांत शिक्षण क्षेत्रातील काही बडे मासे पोलिसांच्या जाळ्यात अडकण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे जळगाव आणि नंदुरबारमधील मोठ्या माशांवर लवकरच कारवाई होणार असल्याची चर्चा आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!