जळगांव जिल्हा प्रतिनिधी, जितेंद्र पाटील.
“समाजाची एकजूट हीच खरी ताकद”; जिल्हास्तरीय मंथनात शिक्षण, सामूहिक विवाह व सामाजिक प्रगतीवर भर
जळगाव, दि. २८ : “समाज संख्येने किती मोठा किंवा छोटा आहे, यापेक्षा त्याची एकजूट किती मजबूत आहे, हे महत्त्वाचे आहे. कुंभार समाजाचा प्रत्येकाच्या आयुष्याशी जन्मापासून अखेरपर्यंत संबंध येतो. मातीला आकार देणाऱ्या या कष्टाळू आणि कलावंत समाजाने आता शिक्षणाच्या बळावर पुढच्या पिढीच्या भविष्यालाही आकार द्यावा. समाजाच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी मी आणि शासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

अखिल महाराष्ट्र कुंभार विकास संस्थेशी संलग्न सकल प्रजापती कुंभार समाज संस्था, जळगाव यांच्या वतीने आयोजित ‘कुंभार मंथन व गौरव सोहळा-२०२६’ मध्ये ते बोलत होते. जिल्हाभरातील समाजबांधवांना एकत्र आणून त्यांच्या प्रश्नांवर विचारमंथन घडविल्याबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आयोजकांचे कौतुक केले. पुरस्कारप्राप्त मान्यवरांचे अभिनंदन करून त्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, समाजातील मुला-मुलींनी अधिकाधिक शिक्षणाच्या प्रवाहात यावे. सामाजिक प्रथांमध्ये काळानुरूप सकारात्मक बदल करत विवाह समारंभ वेळेत व साधेपणाने व्हावेत तसेच सामूहिक विवाह सोहळ्यांना प्रोत्साहन द्यावे. सामाजिक सभागृहांच्या उभारणीसाठी दानशूर व्यक्तींनीही पुढाकार घ्यावा. मतदारसंघातील विविध ठिकाणी कुंभार समाजाच्या मंगल कार्यालयांची कामे पूर्णत्वाच्या मार्गावर असून समाजाच्या योग्य मागण्या व प्रश्नांसाठी आवश्यक ते सहकार्य आणि पाठपुरावा करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

वीट उत्पादक, मूर्तिकार व मातीच्या कलावंतांच्या प्रश्नांवर मंथन
मंथन सत्रात जिल्हाभरातून आलेले वीट उत्पादक, मूर्तिकार तसेच मातीची भांडी व विविध कलाकृती तयार करणाऱ्या कारागिरांनी तालुकानिहाय आपल्या व्यवसायातील अडचणी आणि समस्या मांडल्या. या चर्चासत्राचे सूत्रसंचालन संस्थेचे राज्य सचिव योगेश हिवरकर यांनी केले. संस्थापक अध्यक्ष मोहनरावजी जगदाळे व हिवरकर यांनी समाजबांधवांच्या समस्या जाणून घेत त्यावर आवश्यक स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. पारंपरिक व्यवसाय, शिक्षण, सामाजिक संघटन, युवकांचे भवितव्य आणि समाजाच्या विविध प्रश्नांवर यावेळी सविस्तर विचारमंथन झाले.
यांना मिळाला ‘कुंभार रत्न’, ‘कुंभार गौरव’ व ‘कुंभार कलावंत’ पुरस्कार
विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉ. योगिता अमित हिवरकर (बावस्कर), सायली संजय सोनावणे, डॉ. पायल राजेंद्र सोनावणे, डॉ. शिवप्रसाद राजेश बागुल, मल्हार प्रल्हाद कुंभार, संजय एकनाथ कापडे, साहित्यिक निंबाजी हिवरकर, निंबा कुंभार, आत्माराम झोपडू शिरसाठ, माणिक कुंभार, किशोर भगवान पंडीत, पुनमचंद ठाणकर, मधुकर भागवत न्हावकर आणि प्रविण लोहन पारिसकर यांचा ‘कुंभार रत्न’, ‘कुंभार गौरव’ व ‘कुंभार कलावंत’ पुरस्कारांनी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात संस्थेचे राज्य उपाध्यक्ष प्रकाश कुंभार यांनी समाजाचा पारंपरिक व्यवसाय, काळानुरूप आवश्यक बदल आणि समाजासमोरील अडीअडचणी मांडल्या.
मुख्य कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक शाम जगताप यांनी केले, तर जिल्हाध्यक्ष पद्माकर शिरसाट यांनी आभार मानले.
यांची होती उपस्थिती
आमदार राजूमामा भोळे, अखिल महाराष्ट्र कुंभार विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मोहनरावजी जगदाळे, प्रभारी अध्यक्ष बळवंत शेठ कुंभार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ सोनवणे, सहसचिव रमेश पितांबर सोनवणे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी सभापती राजेंद्र चव्हाण, नगराध्यक्ष पंकज महाजन, पंकज पाटील, कृष्णा सोनवणे, प्रभाकर कापडे, आनंदा चित्ते, मुरलीधर न्हवकर, यशवंत न्हावकर, विश्वनाथ मोरे, भगवान खांजोडे यांच्यासह जिल्हाभरातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
