जळगाव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार.
जळगाव : जळगाव विमानतळ रोड परिसरात वीज दुरुस्तीचे काम सुरू असताना विद्युत खांबावर चढलेल्या महावितरणच्या ३५ वर्षीय कंत्राटी कर्मचाऱ्याला अचानक विजेचा धक्का लागून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. महेश देविदास अपार असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव विमानतळ रोड परिसरात वीज दुरुस्तीचे काम सुरू असताना महेश अपार हे विद्युत खांबावर चढले होते. याचवेळी अचानक विद्युत प्रवाहाचा धक्का लागल्याने ते खांबावरून खाली कोसळले. या दुर्घटनेत ते गंभीर जखमी झाले.
घटनेनंतर सहकारी कर्मचारी व नागरिकांनी तातडीने महेश अपार यांना जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली.
दरम्यान, या दुर्घटनेनंतर वीजपुरवठा बंद करण्याची प्रक्रिया नेमकी कशी राबविण्यात आली आणि दुरुस्तीचे काम सुरू असताना विद्युत प्रवाह पुन्हा कसा सुरू झाला? असा गंभीर सवाल मृत महेश अपार यांच्या नातेवाईकांकडून उपस्थित करण्यात आला आहे. विद्युत प्रवाह सुरू झाल्यामुळेच हा अपघात झाल्याचा आरोप करत संबंधितांची जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या घटनेची महावितरणकडून सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. चौकशीत कोणाचीही चूक किंवा निष्काळजीपणा आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली जाईल, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
या दुर्घटनेमुळे वीज दुरुस्तीच्या कामादरम्यान सुरक्षा नियमांचे पालन, विद्युत पुरवठा पूर्णपणे बंद असल्याची खात्री आणि संबंधित यंत्रणांमधील समन्वय याबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
