जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील.

रावेर लोकसभा मतदारसंघातील मुक्ताईनगर व मलकापूर तालुक्यातील गावांना भेट; शेतकऱ्यांशी थेट संवाद

रावेर लोकसभा मतदारसंघात यंदा कमी पावसामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकऱ्यांच्या पिकांवर गंभीर संकट ओढावले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी आज मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा-काकोडा व पिंप्राळा तसेच मलकापूर तालुक्यातील खामखेड, जांभुळधाबा, हरणखेड व लोणवाडी या गावांना भेट दिली. मलकापूर तालुक्यातील भेटीदरम्यान आमदार श्री. चैनसुख संचेती हे त्यांच्यासोबत उपस्थित होते.

या दौऱ्यात केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी शेतीच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी शेतकरी बांधवांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी, पिकांची सद्यस्थिती आणि झालेल्या नुकसानीची वस्तुनिष्ठ माहिती जाणून घेतली. शेतकऱ्यांच्या कष्टाची व अडचणींची शासनाला पूर्ण जाणीव असल्याचे सांगत, या संकटाच्या काळात शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शेतकऱ्यांच्या हितासाठी नुकसानग्रस्त पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून आवश्यक मदत उपलब्ध करून देण्याबरोबरच शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर सातत्याने उपाययोजना करण्यात येणार असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी स्पष्ट केले.

यावेळी स्थानिक भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते, महसूल विभागाचे अधिकारी तसेच मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!