विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.

यावल – जळगाव जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला हैराण करून सोडणाऱ्या विज चोर टोळीचा यावल पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. महावितरणच्या विद्युत वाहिनीवरच्या अॅल्युमिनियमच्या तारा आणि शेतकऱ्यांच्या विहिरीवरील सबमर्सिबल पंपाच्या कॉपर केबल चोरणारी ही आंतर-गावीय टोळी आहे. या प्रकरणी पोलिसांनी १० सराईत आरोपींना अटक केली असून, चोरीचा माल खरेदी करणारा व्यापारी आणि एक विधिसंघर्षग्रस्त बालक यांनाही ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून एकूण ६ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

जिल्ह्यात तार चोरीच्या घटना वाढल्याने पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी तातडीने तपासाचे आदेश दिले होते. अपर पोलीस अधीक्षक अशोक सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली यावलचे पोलीस निरीक्षक रंजन गवळे व रंगनाथ धारबळे यांच्या पथकाने तपास सुरू केला.

गुप्त माहितीवरून पहिली अटक

किनगाव ते माळोद रोडवर काही जण संशयास्पदरित्या फिरत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. पथकाने तत्काळ कारवाई करत सपक उर्फ स्पड हसन तडवी, वय ३४, रा. माळोद याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीतून संपूर्ण टोळीचा सुगावा लागला. त्याने दिलेल्या माहितीवरून चोरीचा माल घेणारा आरिफ युसूफ मणियार, वय ४३, रा. किनगाव याचा सहभाग समोर आला.

तपासाची साखळी पुढे सरकताच माळोद व नायगाव परिसरातील करीम नशीर तडवी, अल्लाउद्दीन मुजाहीद तडवी, आरिफ मुस्तफा तडवी, अफसर अकबर तडवी, खुबाबखान रशीद तडवी, विनोद मेहरबान तडवी, हैदर बसारत तडवी, सलीम भिका तडवी यांना अटक करण्यात आली.

आरोपींनी चोरी केलेल्या सुमारे ३ क्विंटल तारा जळगाव येथील भंगार व्यावसायिक इस्माईल उर्फ लालू मूसा पटेल याला विकल्याची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी १७५ किलो अॅल्युमिनियम तार जप्त केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्रेस नोटनुसार जप्त मुद्देमाल असा :

स्विफ्ट कार क्र. MH-43-AJ-5864 – ५,००,००० रु.

बजाज प्लॅटिना मोटरसायकल क्र. MH-19-DL-6467 – २०,००० रु.

२४० किलो अॅल्युमिनियम विद्युत वाहिनीच्या तारांचे तुकडे – ६०,००० रु.

२ नग सबमर्सिबल मोटरपंप – ४०,००० रु.

२०० फूट लांबीची कॉपर केबल – २०,००० रु.

तार कापण्याचे कटर – २,००० रु.

एकूण किंमत – ६,४२,००० रु.

या कारवाईमुळे यावल परिसरातील महावितरणच्या आणि शेतकऱ्यांच्या मोटरपंप चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस येणार असून, या मालाची खरेदी-विक्री करणाऱ्या इतरांचीही चौकशी सुरू असल्याचे यावल पोलिसांनी सांगितले.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!