नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर, विशेष वृत्तांत.

मुंबई महावितरणच्या विद्युत वितरण यंत्रणेतील वाहिन्या, उपकरणे आणि इतर विद्युत यंत्रणेवर अनधिकृत व्यक्तींमार्फत कामे करून घेण्यास आता प्रतिबंध करण्यात आला आहे. विद्युत सुरक्षेच्या दृष्टीने महावितरणने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Central Electricity Authority (Measures relating to Safety and Electric Supply) Regulations, 2023 मधील Regulation 3 नुसार विद्युत वितरण सेवेशी संबंधित कामे केवळ अधिकृत व पात्र व्यक्तींमार्फतच केली जाणे आवश्यक आहे. कंपनीने अधिकृतपणे नामनिर्देशित न केलेल्या खासगी, अपात्र अथवा अनधिकृत व्यक्तीकडून विद्युत यंत्रणेवर काम करून घेणे हे बेकायदेशीर व अनधिकृत स्वरूपाचे असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.

अनधिकृत मनुष्यबळाकडून विद्युत वाहिन्या किंवा उपकरणांवर काम करून घेतल्यास विद्युत अपघात, जीवितहानी तसेच महावितरणच्या मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना निदर्शनास आल्यास त्यांची चौकशी करून दोषी आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

तसेच, संबंधित विभागीय अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात अनधिकृत मनुष्यबळाचा विद्युत कामांसाठी वापर होत नसल्याची वेळोवेळी खात्री करावी, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.

नागरिकांनीही घ्यावी खबरदारी

महावितरणच्या या निर्णयामुळे नागरिकांसाठीही महत्त्वाचा सुरक्षा संदेश देण्यात आला आहे. घरगुती किंवा इतर विद्युत कामांसाठी अनधिकृत व्यक्तीची मदत घेणे टाळावे. विद्युत यंत्रणेवरील कामे शक्यतो अधिकृत व पात्र व्यक्तींकडूनच करून घ्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

महावितरण संचालक (संचालन) यांच्या 24 सप्टेंबर 2026 रोजीच्या परिपत्रकातून विद्युत सुरक्षेला प्राधान्य देत अनधिकृत कामांना आळा घालण्यासाठी स्पष्ट निर्देश जारी करण्यात आले आहेत.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!