जळगांव प्रतिनिधी, महेश माळी

मेहरूण : श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथील इको क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या सीड बँक उपक्रमातील ५१ हजार बिया शाळेचे संस्थाचालक अध्यक्ष प्रशांत सुरेश नाईक यांना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट म्हणून देण्यात आल्या. विद्यार्थी व माजी विद्यार्थ्यांनी प्रेमपूर्वक दिलेल्या या अनोख्या भेटीचा श्री गणरायाला भोग अर्पण करून प्रशांत नाईक यांनी पर्यावरण संवर्धनाचा कृतीशील संकल्प केला.

विद्यार्थ्यांनी विविध ठिकाणांहून बिया संकलित करून त्यांचे जतन केले आहे. या बियांमध्ये भविष्यातील हिरवाईचे बीज दडलेले असून, वाढदिवसानिमित्त मिळालेल्या या अनोख्या भेटीचे रोपांमध्ये व पुढे वृक्षांमध्ये रूपांतर करून जंगलनिर्मिती करण्याचा निर्धार प्रशांत नाईक यांनी व्यक्त केला.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने शाळेने ‘मोदक नको, झाडे हवीत!’ हा पर्यावरणपूरक संदेश देत उत्सवाला वृक्षसंवर्धनाची जोड दिली. पारंपरिक पद्धतीने मिठाई किंवा भेटवस्तू देण्याऐवजी विद्यार्थ्यांनी दिलेल्या ५१ हजार बियांची भेट पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरली.

‘बीज ते वृक्ष आणि वृक्ष ते जंगल’ या संकल्पनेतून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्याबरोबरच कृतीशील पर्यावरण संस्कार रुजविण्याचा प्रयत्न शाळेच्या इको क्लबतर्फे सुरू आहे. या सीड बँक उपक्रमाला संस्थाध्यक्ष प्रशांत नाईक यांनी दिलेली साथ विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली.

वाढदिवसानिमित्त मिळालेल्या ५१ हजार बियांचा श्री गणरायाला भोग अर्पण करून त्याच बियांच्या माध्यमातून भविष्यात जंगल उभे करण्याचा संकल्प करण्यात आल्याने वाढदिवसाची भेट पर्यावरण संवर्धनाच्या संकल्पात रूपांतरित झाली. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला आणि पर्यावरणप्रेमाला संस्थाध्यक्षांनी कृतीची जोड दिल्याने शाळेच्या पर्यावरणपूरक वाटचालीला नवे बळ मिळाले.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मुकेश सुरेश नाईक, शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी, माजी विद्यार्थी, पालक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

संस्थाध्यक्ष प्रशांत सुरेश नाईक यांना वाढदिवसानिमित्त शाळेतील विद्यार्थी, माजी विद्यार्थी, शिक्षक-शिक्षिका, पालक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांच्या दीर्घायुष्यासह सामाजिक, शैक्षणिक व पर्यावरण संवर्धनाच्या कार्यासाठी सर्वांनी सदिच्छा व्यक्त केल्या. त्यांच्या वाढदिवसाचा हा पर्यावरणपूरक संकल्प भविष्यात अनेक वृक्षांच्या रूपाने फुलावा, अशा शुभेच्छाही यावेळी देण्यात आल्या.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!