जळगाव जिल्हा प्रतिनिधी, शाकीर शेख.
जळगावच्या रावेर येथे सरदार जी. जी. हायस्कूल व अंबिका व्यायामशाळा, रावेर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय शासकीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत रावेर तालुक्यातील विविध शाळांमधील कुस्तीपटूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कुस्ती कौशल्याचे प्रदर्शन केले.

स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी माजी नगराध्यक्ष पद्माकर जी. महाजन अध्यक्षस्थानी होते. यावेळी रावेर शिक्षण संवर्धक संघाचे संचालक महेश अत्रे, अंबिका व्यायामशाळेचे अध्यक्ष भास्कर पहलवान, रवींद्र महाजन, भगवान चौधरी यांच्यासह तालुक्यातील विविध शाळांचे क्रीडा शिक्षक व व्यवस्थापन प्रतिनिधी उपस्थित होते.
स्पर्धेचे नियोजन व आयोजन सरदार जी. जी. हायस्कूलचे क्रीडा शिक्षक जे. के. पाटील, युवराज माळी, अजय महाजन व किरण महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले. कुस्ती सामन्यांचे परीक्षण पंच म्हणून सखाराम असलकर, भरत छपरीबंद व योगेश प्रजापती यांनी केले.

स्पर्धेत सहभागी झालेल्या कुस्तीपटूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत उपस्थितांची दाद मिळवली. विजयी तसेच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना उपस्थित मान्यवरांनी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देत पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन दिले.
विद्यार्थ्यांनी स्पर्धेत खिलाडूवृत्तीने सहभाग घेतला. संपूर्ण स्पर्धा उत्साहपूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली.
