जळगाव प्रतिनिधी, जितेंद्र पाटील.
जळगांव शहरातील कांचन नगर परिसरात जुन्या वादातून तरुणावर शस्त्राने हल्ला केल्याच्या प्रकरणाचा शनिपेठ पोलिसांनी छडा लावत तिघा संशयितांना अटक केली आहे. राहुल अशोक शिंदे, विजय जयवंत शिंदे आणि लखन सुनील कोळी अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, १२ सप्टेंबर रोजी कांचन नगर परिसरात क्षितीज निधाने या तरुणावर शस्त्राने हल्ला करण्यात आला होता. जुन्या वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली. घटनेनंतर संशयित घटनास्थळावरून पसार झाले होते.
प्रकरणाची माहिती मिळताच शनिपेठ पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत संशयितांचा शोध सुरू केला. त्यांच्या हालचालींची माहिती घेत अखेर तिघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले. त्यांच्याविरोधात पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
कांचन नगरातून तिघांची धिंड
तिघांना अटक केल्यानंतर शनिपेठ पोलिसांनी त्यांना कांचन नगर परिसरातून फिरवून नेले. या कारवाईची परिसरात मोठी चर्चा रंगली. गुन्हेगारी घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून कठोर भूमिका घेतली जात असल्याचे या कारवाईतून दिसून आले.
दरम्यान, हल्ल्यामागील नेमके कारण, वापरण्यात आलेले शस्त्र तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास शनिपेठ पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणातील पुढील तपासाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
