२२ हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी गजानन कोळीविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये कारवाई
जळगांव जिल्हा प्रतिनिधी, जितेंद्र पाटील.
जामनेर : सामरोद शिवारात शामराव बळीराम पाटील यांच्या शेताजवळील नाल्यात झाडाझुडपांच्या आड सुरू असलेल्या गावठी दारू निर्मितीच्या ठिकाणी जामनेर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत गजानन गंगाराम कोळी (वय २९, रा. सामरोद, ता. जामनेर) याच्याकडून सुमारे ४०० लिटर गावठी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन तसेच २० लिटर तयार गावठी दारू, असा एकूण २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सामरोद शिवारात अवैधरीत्या गावठी दारू तयार केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी संबंधित ठिकाणी कारवाई केली. झाडाझुडपांमध्ये लपवून ठेवलेले दारू निर्मितीचे कच्चे रसायन व तयार दारू पोलिसांनी ताब्यात घेतली.
या प्रकरणी आरोपी गजानन गंगाराम कोळी याच्याविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी जयसिंग राठोड तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.
जामनेर पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, परिसरातील अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
