विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गणेशोत्सवाच्या उत्साहाला भीषण अपघाताने गालबोट लागले आहे. चित्तेपिंपळगाव-करमाड मार्गावरील पिंप्रीराजा गावच्या वळणावर गणरायाच्या आगमन मिरवणुकीत भरधाव कंटेनर घुसल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघातात कंटेनरने १४ जणांना धडक दिली असून, दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर १२ जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंप्रीराजा गावात गणपती आगमन सोहळ्याची तयारी सुरू होती. मिरवणुकीसाठी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांची गर्दी जमली होती. त्याचवेळी भरधाव वेगाने येणारा कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट मिरवणुकीत घुसला. त्याने समोरील दुचाकींना जोरदार धडक देत अनेकांना चिरडले.

या भीषण अपघातात विठ्ठल राममाळ जाधव आणि रमेश लहूजी बनसोडे या दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

अपघाताची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली असून तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत जखमींना बाहेर काढले आणि रुग्णवाहिकेतून छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल केले आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. हा अपघात नेमका कसा घडला, कंटेनरचा ब्रेक फेल झाला होता का, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!