जळगाव जिल्हा प्रतिनिधी – निलेश खैरनार
जळगाव : जिल्ह्यात महिनाभर दडी मारलेल्या पावसाने अखेर सर्वदूर जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे काही पिकांना जीवदान मिळाले असले, तरी काढणीच्या अवस्थेतील केळी बागांना मात्र या पावसाचा मोठा फटका बसला आहे. विशेषतः चोपडा तालुक्यात अनेक ठिकाणी केळीची झाडे जमिनीवर कोसळल्याचे चित्र दिसून येत आहे.
गेल्या महिनाभरापासून पावसाने ओढ दिल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला होता. त्यामुळे केळीच्या झाडांच्या मुळांचा अपेक्षित विकास होऊ शकला नाही. मुळांची पकड कमकुवत राहिल्याने झाडे वरून हिरवीगार व उत्पादनक्षम दिसत असली, तरी जमिनीत त्यांना पुरेसा आधार मिळत नव्हता. त्यातच आता झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक काढणीयोग्य झाडे वाऱ्याच्या व पावसाच्या तडाख्यात जमीनदोस्त झाली आहेत.
चोपडा तालुक्यात सर्वाधिक नुकसान
चोपडा तालुक्यातील विविध गावांमध्ये केळी बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. काढणीच्या टप्प्यावर असलेली केळीची झाडे पडल्याने वर्षभर केलेली मेहनत आणि झालेला उत्पादन खर्च वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
आधीच केळीला अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने उत्पादन खर्च आणि मिळणारा दर यांचा ताळमेळ बसत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. कमी बाजारभावामुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या उत्पादकांसमोर आता पावसामुळे काढणीवरील बागांचे नुकसान झाल्याने दुहेरी संकट उभे ठाकले आहे.
परिपक्व घडही जमिनीवर; विक्रीचे संकट
वर्षभर मोठा खर्च आणि मेहनत करून तयार केलेल्या केळीच्या बागांना योग्य भाव मिळत नसतानाच आता नैसर्गिक संकटाचा तडाखा बसला आहे. जमिनीवर पडलेले परिपक्व तसेच अपरिपक्व केळीचे घड काही काळात खराब होण्याची शक्यता असल्याने त्यांची विक्री करणेही शेतकऱ्यांसाठी आव्हानात्मक ठरणार आहे.
तातडीने पंचनामे करून मदतीची मागणी
काढणीच्या अवस्थेतील केळीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी होत आहे. तसेच पडलेली झाडे, नुकसान झालेले केळीचे घड यांची स्वतंत्र नोंद घेऊन त्वरित पंचनामे करण्यात यावेत, अशी मागणी केळी उत्पादक शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
महिनाभर पावसाची प्रतीक्षा आणि आता मुसळधार पावसाचा तडाखा—या दोन्ही नैसर्गिक परिस्थितींमध्ये केळी उत्पादक शेतकरी मात्र आर्थिक कोंडीत सापडला आहे.
