जळगांव प्रतिनिधी, महेश माळी.

मेहरूण : गणेशोत्सवाला पर्यावरण संवर्धनाची जोड देत मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात गणेशोत्सवाच्या निमित्ताने आजपासून ‘सीड लायब्ररी (Seed Library)’ या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. गणरायाच्या आगमनासोबतच विद्यार्थ्यांमध्ये बीजसंवर्धन, वृक्षसंवर्धन आणि जैवविविधतेविषयी जागरूकता निर्माण करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.

या उपक्रमांतर्गत शाळेत ‘बीज दानपेटी’ ठेवण्यात आली आहे. पालक, विद्यार्थी, शिक्षक आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांनी आपल्या घरातील विविध झाडांच्या बिया शाळेत दान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आंबा, जांभूळ, चिंच, सीताफळ, बेल, वड, पिंपळ, कडुनिंब, गुलमोहर, आपटा आदी स्थानिक वृक्षांच्या बियांचे संकलन करून त्यांची विद्यार्थ्यांकडून वर्गवारी, नोंदणी, जतन व संवर्धन केले जाणार आहे.

संकलित बियांपासून पुढील काळात रोपे तयार करून त्यांचे वृक्षारोपण केले जाणार असून विद्यार्थ्यांना ‘बीज ते वृक्ष’ हा संपूर्ण प्रवास प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमातून “गणरायाला एक बीज अर्पण, भविष्यासाठी एक वृक्ष संकल्प” हा पर्यावरणपूरक संदेश देण्यात येत आहे.

“एक बीज दान करा… उद्याचे एक झाड घडवा!” या आवाहनाला प्रतिसाद देत पालकांनी आपल्या घरातील उपलब्ध बिया शाळेच्या बीज दानपेटीत जमा करून या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन शाळेच्या वतीने करण्यात आले आहे.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम, पर्यावरणीय जबाबदारी, जैवविविधता संवर्धन आणि वृक्षसंवर्धनाचे संस्कार रुजण्यास मदत होणार आहे. — श्री. मुकेश सुरेश नाईक, मुख्याध्यापक, श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!