जळगांव प्रतिनिधी, महेश माळी.

मेहरूण : पर्यावरण संवर्धनाचा संदेश विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्यासाठी मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. गणरायासाठी दहा दिवस दररोज वेगवेगळ्या नैसर्गिक व पुनर्वापरित साहित्यापासून तयार केलेला हार अर्पण करण्याची अभिनव संकल्पना शाळेने आखली आहे.

या उपक्रमांतर्गत बिया, धान्य, कडधान्ये, कागद, नारळाची साल, वाळलेली पाने, फळांच्या बिया, शाडू माती, ज्यूट व कापूस अशा पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून हार तयार करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांच्या सहभागातून हे हार तयार केले जाणार असून प्रत्येक हारामागे एक पर्यावरण संदेश देण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी ‘बीज अर्पण – हरित विसर्जन’ या संकल्पनेतून बियांचा हार गणरायाला अर्पण करून त्यातील बिया शाळेच्या Seed Bank मध्ये जतन करण्यात येणार आहेत. पुढील काळात या बियांचे रोपण करून वृक्षसंवर्धनाला चालना देण्यात येणार आहे.

‘गणरायाच्या चरणी फुले नव्हे, हरित भविष्यासाठी बीज अर्पण करूया’ हा संदेश देत विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन, पुनर्वापर आणि निसर्गप्रेमाची जाणीव निर्माण करण्याचा शाळेचा प्रयत्न आहे.

मुख्याध्यापक मुकेश सुरेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येणार असून शिक्षक, विद्यार्थी व पालकांचा सहभाग राहणार आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!