विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.

छत्रपती संभाजीनगर – शहरातील औरंगपुरा भाजीमंडी परिसरात भरधाव वेगाने आलेल्या महिंद्रा XUV 500 कारने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन तरुण गंभीर जखमी झाले असून, त्यापैकी एकाचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात २० वर्षीय कार चालकाविरुद्ध शनिवारी, १२ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुढी लाईन येथील रहिवासी मिर्झा अब्बास अली बेग (वय २६) आणि त्यांचे मित्र इब्राहिम मिर्झा मसूद बेग (वय २६) हे बुधवारी, ९ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीनंतर सव्वा बाराच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून (MH 20 CL 1167) औरंगपुरा भाजीमंडीकडून घरी परतत होते.

भाजीमंडीच्या वळणावर खलील पान सेंटरजवळ आले असता, समोरून बुढी लाईनकडून भरधाव वेगात येणाऱ्या महिंद्रा XUV 500 कारने (MH 02 CP 0674) त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोन्ही मित्र रस्त्यावर फेकले गेले.

या अपघातात मिर्झा अब्बास यांना किरकोळ मार लागला, तर इब्राहिम बेग यांच्या मांडीला आणि छातीला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर दोन्ही जखमींना तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर इब्राहिम यांना पुढील उपचारासाठी जुना बाजार येथील औरंगाबाद हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. तेथे तपासणीत त्यांच्या डाव्या मांडीचे हाड तुटल्याचे निष्पन्न झाले आहे.

या घटनेचा पुढील तपास सिटी चौक पोलीस करत आहेत.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!