प्रतिनिधी महेश माळी

पिंपळे निलख : लव्ह मॅरेज केल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करून त्याच्यावर पिस्तूल रोखल्याची धक्कादायक घटना पिंपळे निलख येथील विशालनगर परिसरात घडली. या प्रकरणी सांगवी पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल अण्णासाहेब वीर (वय ३३, रा. विशालनगर) यांनी सायली काळुराम लांडगे हिच्यासोबत लव्ह मॅरेज केले होते. याचा राग मनात धरून आरोपींनी ८ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारास संध्यानगरी बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये अमोल यांना गाठले.

आरोपींनी शिवीगाळ करत “आज तुला जिवंत सोडणार नाही” अशी धमकी दिली. त्यानंतर धारदार लोखंडी कोयत्याने अमोल यांच्या डोक्यावर वार केले. तसेच हाताचा पंजा, बोटे, दंड आणि मनगटावर वार करून त्यांना गंभीर जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

दरम्यान, अमोल हे कोयता ओढत असताना एका आरोपीने पिस्तूल काढण्यास सांगितले. त्यानंतर आरोपीने कमरेला लावलेले पिस्तूल काढून अमोल यांच्या दिशेने रोखल्याचे पोलिस तक्रारीत म्हटले आहे.

अमोल यांना वाचवण्यासाठी त्यांचे भाऊ अनिकेत आणि दीपक पुढे आले असता त्यांनाही दुखापत झाली. हल्ल्यानंतर आरोपी पळून जात असताना रोहन लांडगे याने अमोल यांच्या गळ्यातील अंदाजे तीन तोळे वजनाची सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून नेल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, भारतीय शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी म्हणून संदिप तानाजी लांडगे, रोहन अर्जुन लांडगे, हर्षद काळुराम लांडगे आणि अनिल पांडुरंग लांडगे यांची नावे आहेत. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!