जळगांव प्रतिनिधी, महेश माळी.
मेहरूण : मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात आरोग्य व कल्याण समितीच्या (Health & Wellness Committee) वतीने भारतीय डाक विभाग, जळगाव हेड पोस्ट ऑफिस यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांच्या आर्थिक साक्षरतेसाठी विशेष जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना तसेच मुलांसाठी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना (PPF) याबाबत पालकांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. बचतीचे महत्त्व, नियमित बचतीची सवय, भविष्यातील शिक्षणासाठी आर्थिक नियोजन आणि सुरक्षित आर्थिक भविष्य याबाबत माहिती देण्यात आली.

सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत ० ते १० वर्षे वयोगटातील मुलींसाठी खाते उघडण्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे व योजनेचे फायदे याबाबत पालकांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पीपीएफ योजनेच्या माध्यमातून दीर्घकालीन बचतीचे महत्त्वही समजावून सांगण्यात आले.
आरोग्य व कल्याण समितीच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरता, नियोजनकौशल्य, निर्णयक्षमता, बचतीची सवय आणि भविष्याचा विचार करण्याची वृत्ती विकसित करण्यास चालना मिळाली. पालकांचा सक्रिय सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबतच जीवनोपयोगी कौशल्यांचे ज्ञान देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.

शाळा आणि शासकीय यंत्रणा यांच्या समन्वयातून आयोजित या उपक्रमामुळे शाळा–पालक–समाज–शासकीय विभाग यांच्यातील सहकार्याला बळ मिळाले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत सातत्याने विविध जीवनकौशल्याधारित व जनजागृतीपर उपक्रम राबविले जात असल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले.
या उपक्रमासाठी भारतीय डाक विभाग, जळगाव हेड पोस्ट ऑफिस यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक मुकेश सुरेश नाईक, आरोग्य व कल्याण समितीच्या प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
“आजची बचत, उद्याचे सुरक्षित भविष्य!” या संदेशातून पालकांनी आपल्या पाल्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी बचत व योग्य आर्थिक नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले.
