चोपड्यात चौधरी बंधूंकडून सर्जा-राजाची बँड-बाजा, ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक

चोपडा तालुका प्रतिनिधी, योगेश पाटील.

चोपडा : वर्षभर शेतात अहोरात्र राबून बळीराजाच्या खांद्याला खांदा लावून शेतीची कामे करणाऱ्या सर्जा-राजाच्या ऋणाची जाणीव व्यक्त करणारा सण म्हणजे बैल पोळा! या पारंपरिक सणाचे औचित्य साधत चोपडा येथील कै. गोपाल पंढरीनाथ चौधरी यांचे सुपुत्र तथा हॉटेल गोपालचे संचालक श्री. पवन गोपाल चौधरी व श्री. लोकेश गोपाल चौधरी या चौधरी बंधूंनी मूक प्राण्यांप्रती असलेला आपला जिव्हाळा आणि प्रेम अनोख्या पद्धतीने व्यक्त केले.

चौधरी बंधूंनी आपल्या लाडक्या बैलांची आकर्षक व देखणी सजावट करून बँड-बाजा आणि ढोल-ताशांच्या गजरात शहरातून भव्य मिरवणूक काढली. रंगीबेरंगी सजावटीने नटलेले बैल आणि ढोल-ताशांच्या तालावर निघालेली ही मिरवणूक चोपडावासीयांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. सर्जा-राजाच्या या रुबाबदार थाटाने शहरातील नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले.

ही भव्य मिरवणूक तिरंगा चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक आदी प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत चौधरी बंधूंच्या निवासस्थानी पोहोचली. घरी पोहोचल्यानंतर बैलांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करण्यात आले. त्यानंतर विधिवत पूजा-अर्चा करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला आणि सर्जा-राजाचा यथोचित सन्मान करण्यात आला.

बैल पोळ्याच्या निमित्ताने चौधरी बंधूंनी जपलेली ही परंपरा केवळ उत्सवापुरती मर्यादित न राहता कृषी संस्कृती, शेतकरी आणि मूक प्राण्यांप्रती असलेली कृतज्ञता अधोरेखित करणारी ठरली. आधुनिकतेच्या काळातही आपल्या मातीतल्या परंपरा आणि पशुधनाविषयीचे प्रेम जपणारा हा उपक्रम परिसरात कौतुकाचा आणि प्रेरणादायी विषय ठरला आहे.

या प्रसंगी परिसरातील नागरिक, व्यावसायिक, स्नेही, मित्रपरिवार तसेच बैल पोळ्याचा आनंद घेण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!