विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.
धरणगाव: धरणगाव तालुक्यातील पाळधी बायपासवरील टाहाकळी फाट्याजवळ बुधवारी भीषण अपघात घडला. अनियंत्रित होऊन पलटी झालेल्या कंटेनरखाली दबला जाऊन करण जनार्दन सोनवणे (वय २२) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, करण सोनवणे हा दुचाकीवरून पाळधी बायपासवरील टाहाकळी फाट्याजवळ आला होता. त्याने आपली मोटारसायकल रस्त्याच्या कडेला लावली होती आणि तो मोबाईलवर बोलत उभा होता. त्याचवेळी बायपासवरून येणारा एक भरधाव कंटेनर अचानक अनियंत्रित होऊन पलटी झाला. पलटी झालेला कंटेनर थेट करणच्या अंगावर कोसळला आणि तो त्याखाली दबला गेला.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. करणला तातडीने बाहेर काढून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. २२ वर्षीय तरुणाच्या दुर्दैवी मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, या अपघाताच्या ठिकाणी बायपास रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. मात्र, या कामाबाबत वाहनचालकांना पूर्वसूचना देणारे कोणतेही सूचना फलक, दिशादर्शक चिन्हे किंवा खबरदारीचे उपाय लावण्यात आले नव्हते, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वाहनचालकांना माहिती उशिरा मिळाल्याने कंटेनर अनियंत्रित होऊन पलटी झाल्याचा दावा ग्रामस्थांनी केला असून, रस्ते कामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.
अपघातानंतर बायपासवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. माहिती मिळताच पाळधी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला आणि वाहतूक सुरळीत केली.
या दुर्घटनेमुळे रस्त्याच्या दुरुस्तीच्या ठिकाणी वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी योग्य सूचना फलक आणि उपाययोजना करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.
