विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.
वनविभागाने तातडीने उपाययोजना करण्याची ग्रामस्थांची मागणी; पिंजरा व ट्रॅप कॅमेरे लावण्याची मागणी
चोपडा : चोपडा तालुक्यातील विटनेर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी रात्री बिबट्याने गोठ्यात घुसून गायीच्या बछड्यावर हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत बछडा जखमी झाला असून, बिबट्याचा वाढता वावर नागरिकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

ग्रामस्थांच्या माहितीनुसार, विटनेर परिसरात सुमारे सहा महिन्यांपासून बिबट्याचा वावर आहे. बुधवारी माजी उपसभापती सुभाष लोटन कोळी यांच्या गोठ्यात बिबट्याने प्रवेश करून तेथील गायीच्या बछड्यावर हल्ला केला. बछड्याला गंभीर दुखापत झाली असून, बिबट्याने केलेल्या हल्ल्याचे ठसेही परिसरात आढळून आले आहेत.
बिबट्याच्या सातत्याने होणाऱ्या वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शेतात काम करण्यासाठी जाणे, जनावरांना चराईसाठी बाहेर सोडणे तसेच सायंकाळनंतर शेत परिसरात ये-जा करणे याबाबत शेतकरी धास्तावले आहेत. बिबट्या मानवी वस्तीजवळ तसेच गोठ्यांच्या परिसरात फिरत असल्याने भविष्यात मनुष्य किंवा पाळीव जनावरांवर हल्ला होण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
परिसरात तातडीने ट्रॅप कॅमेरे बसवून बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवावे, त्याचा वावर असलेले ठिकाण निश्चित करावे आणि आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच बिबट्याला पकडण्यासाठी योग्य ठिकाणी पिंजरा लावण्यात यावा, अशीही मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, बिबट्याच्या हल्ल्यात गायीच्या बछड्याचे नुकसान झाल्याने संबंधित शेतकऱ्याला शासनाच्या नियमानुसार आर्थिक नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे. वनविभाग व महसूल प्रशासनाने घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पंचकोशीतील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
बिबट्याचा वाढता वावर लक्षात घेता केवळ घटना घडल्यानंतर कारवाई न करता प्रतिबंधात्मक उपाययोजनांना प्राधान्य द्यावे, अन्यथा परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. उपाययोजना न झाल्यास पंचकोशीतील ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
