जळगांव प्रतिनिधी, महेश माळी.
मेहरुण : विद्यार्थ्यांना मराठी व्याकरणाचे ज्ञान केवळ पाठांतरातून न देता ते कृती, सराव आणि दैनंदिन वापरातून आत्मसात करता यावे, तसेच विद्यार्थ्यांच्या लेखन व अभिव्यक्ती कौशल्याला चालना मिळावी, या उद्देशाने श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे इयत्ता आठवी, नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘व्याकरणगंगा’ या अभिनव उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शब्दांच्या जाती, काळ, लिंग-वचन, विभक्ती, वाक्यरचना, वाक्यप्रकार, प्रयोग, संधी, समास, उपसर्ग-प्रत्यय, वाक्प्रचार, म्हणी, समानार्थी व विरुद्धार्थी शब्द, शुद्धलेखन, विरामचिन्हे आणि वाक्यशुद्धी अशा विविध व्याकरण घटकांचा सराव करून घेतला जाणार आहे.
तसेच व्याकरणाचा प्रत्यक्ष जीवनातील उपयोग विद्यार्थ्यांना समजावा यासाठी पत्रलेखन, वृत्तांतलेखन, बातमीलेखन, निबंधलेखन, कथालेखन, मुद्द्यांवरून गोष्ट, संवादलेखन, जाहिरातलेखन, भाषणलेखन, सूचना लेखन व आत्मकथन अशा उपयोजित लेखनप्रकारांचाही सराव घेण्यात येणार आहे.
प्रत्येक घटकासाठी ‘नियम समजून घ्या – उदाहरण पाहा – स्वतः करून पाहा – लेखनातून वापरा’ या पद्धतीने उपक्रम राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना विविध कृती, शब्दखेळ, प्रश्नमंजुषा, गटकार्य, लेखनसराव आणि छोट्या चाचण्यांच्या माध्यमातून व्याकरण शिकविण्यात येणार आहे.
या उपक्रमासाठी श्रीमती साधना शिरसाट, श्रीमती उज्वला नन्नवरे, श्रीमती सरला पाटील, श्री. दिनेश पाटील आणि श्री. सतीश गोसावी हे शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. पर्यवेक्षिका श्रीमती शितल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मुख्याध्यापक श्री. मुकेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा नियमित आढावा घेऊन उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक व प्रोत्साहन करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची भाषाशुद्धी, शब्दसंपदा, लेखनकौशल्य, आकलनशक्ती आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार आहे.
‘व्याकरणातून भाषाशुद्धी, भाषाशुद्धीतून प्रभावी लेखन आणि प्रभावी लेखनातून आत्मविश्वास’ या उद्देशाने राबविण्यात येणारा ‘व्याकरणगंगा’ उपक्रम विद्यार्थ्यांच्या मराठी भाषेच्या ज्ञानाला नवी दिशा देणारा ठरणार आहे.
