विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.

जामनेरच्या भूमिअभिलेख कार्यालयातील एका लोकसेवकाला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. भगवान रोहिदास गायकवाड (वय ५२) असे या लोकसेवकाचे नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, ६५ वर्षीय शेतकऱ्याने त्यांच्या शेतजमिनीच्या मोजणीसाठी लागणारे स्कीम पत्रक आणि टिपण उतारा मिळवण्यासाठी अर्ज केला होता. हे काम करून देण्यासाठी गायकवाड यांनी संबंधित शेतकऱ्याकडे ७०० रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.

या प्रकाराला कंटाळून शेतकऱ्याने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव यांच्याकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची शहानिशा करण्यासाठी विभागाने ८ सप्टेंबर २०२६ रोजी जामनेर येथील उपअधीक्षक, भूमिअभिलेख कार्यालयात पंचांसमक्ष पडताळणी केली. पडताळणी दरम्यान आरोपीने तडजोड करून २०० रुपये लाचेची मागणी केली आणि ती घेण्यास तयारी दर्शवली.

त्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला आणि २०० रुपयांची लाच स्वीकारताच भगवान गायकवाड यांना ताब्यात घेतले.

या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाच्या कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्हा दाखल होताच पुढील अटकेची कारवाई केली जाणार आहे.

ही संपूर्ण कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगावचे पोलीस निरीक्षक हेमंत नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी पर्यवेक्षक अधिकारी पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्यासह पोलीस कर्मचारी बाळू मराठे, प्रणेश ठाकूर आणि सचिन चाटे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!