जळगांव प्रतिनिधी, महेश माळी.

मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी जळगाव येथील कवी कालिदास सभागृहात आयोजित ‘न समजलेले आई-बाप’ या प्रेरणादायी व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सुमारे ५० ते ६० विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच १० शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते.

प्राध्यापक वसंत हंकारे यांनी आपल्या प्रभावी आणि ओघवत्या शैलीत विद्यार्थ्यांशी संवाद साधत आई-वडिलांचे प्रेम, त्याग, कष्ट आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ते घेत असलेल्या मेहनतीची जाणीव करून दिली. पालकांशी संवाद साधा, त्यांचा आदर करा आणि त्यांच्या त्यागाबद्दल कृतज्ञ राहा, असा भावनिक व प्रेरणादायी संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

व्याख्यानादरम्यान विविध उदाहरणे व जीवनातील प्रसंग सांगून विद्यार्थ्यांना आत्मपरीक्षण करण्यास प्रवृत्त करण्यात आले. पालकांच्या भावना समजून घेणे, त्यांच्या कष्टांची जाणीव ठेवणे आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे, या बाबींवर हंकारे यांनी विशेष मार्गदर्शन केले.

कार्यक्रमानंतर विद्यालयातील विद्यार्थी तसेच शिक्षक-शिक्षिकांनी वसंत हंकारे सर यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शैक्षणिक तसेच सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.

विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष अनुभव, प्रेरणादायी व्याख्याने आणि जीवनमूल्यांचे शिक्षण मिळावे, या उद्देशाने विद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांना या कार्यक्रमास नेण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पालकांविषयी कृतज्ञता, संवेदनशीलता आणि जबाबदारीची भावना अधिक दृढ झाली.

या उपक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक मुकेश सुरेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक-शिक्षिकांनी केले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!