विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.

रावेर : रावेर तालुक्यातील मेहुणा-अहिरवाडी परिसरात सोमवारी सकाळी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. सकाळी सुमारे ७ वाजून ४७ मिनिटांनी हा धक्का जाणवल्याची माहिती समोर आली असून, भूकंपाची तीव्रता ३.३ रिश्टर स्केल इतकी नोंदविण्यात आली आहे.

अचानक झालेल्या या भूकंपामुळे परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र गंगापुरी धरणाजवळील जमिनीखालील भागात असल्याचे सांगण्यात येत आहे.

भूकंपाचा धक्का सौम्य स्वरूपाचा असल्याने आतापर्यंत कोणतीही मोठी जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही. मात्र, अचानक जाणवलेल्या हादऱ्यांमुळे मेहुणा, अहिरवाडी तसेच आसपासच्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

या घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. रावेरचे तहसीलदार संजय तायडे यांनी नागरिकांना घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

प्रशासनाकडून नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीवर विश्वास ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, भूकंपामुळे नेमके किती नुकसान झाले आहे, याची माहिती प्रशासनाकडून घेतली जात असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!