विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.

घरात घुसून तोडफोड व मारहाणीचा दावा; लोटन देसले यांच्यावर गंभीर आरोप, अधिकृत तपासानंतरच सत्य स्पष्ट होणार

धुळे : महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या बनावट शाळार्थ आयडी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात बुधवारी घडलेल्या कथित हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. या घटनेत या प्रकरणातील तक्रारदार महेंद्र देसले यांच्या माळीच येथील निवासस्थानी जमावाने घुसून मारहाण व तोडफोड केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या कथित हल्ल्यात महेंद्र देसले यांच्यासह त्यांच्या पत्नी, मुलांवर तसेच पुतण्यांवरही हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. अचानक झालेल्या या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.

महेंद्र देसले यांनी या हल्ल्यामागे भाजपशी संबंधित कार्यकर्ते लोटन देवीदास देसले (एल.डी. देसले) यांचा हात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. मात्र, हा आरोप असून त्याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. पोलिस तपासातूनच हल्ल्यामागील नेमके कारण आणि संबंधित व्यक्तींची भूमिका स्पष्ट होणार आहे.

बनावट शाळार्थ आयडी तसेच कथित बोगस मान्यतांशी संबंधित प्रकरणात महेंद्र देसले यांनी यापूर्वी विविध तक्रारी केल्याचे सांगण्यात येते. या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर काही शिक्षकांच्या वेतनासंदर्भात कारवाई झाल्याचा दावाही करण्यात आला आहे. त्यामुळे तक्रारींचा राग मनात धरून हल्ला करण्यात आला का, तक्रारी मागे घेण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न झाला का किंवा प्रकरणाचा पाठपुरावा थांबविण्यासाठी दबाव निर्माण करण्यात आला का, या सर्व बाबींचा तपास होणे आवश्यक आहे.

दरम्यान, या घटनेशी संबंधित व्हिडिओ आणि अन्य डिजिटल पुरावे उपलब्ध असल्याचा दावा करण्यात येत आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही व व्हिडिओ फुटेज, प्रत्यक्षदर्शींचे जबाब, मोबाइल लोकेशन आणि कॉल रेकॉर्ड यांसह उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपास करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

या घटनेपूर्वी डॉ. पंकज साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत स्वतःच्या तसेच सहकाऱ्यांच्या जीविताला धोका असल्याची भीती व्यक्त केल्याचा दावाही करण्यात आला आहे. त्यानंतर त्यांच्या निकटवर्तीय सहकाऱ्याच्या कुटुंबावर कथित हल्ला झाल्याने या पूर्वीच्या इशाऱ्याचीही पोलिसांनी गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, या प्रकरणात कोणताही राजकीय दबाव न ठेवता निष्पक्ष तपास करावा आणि दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी महेंद्र देसले व त्यांच्या कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!