नांदेड : नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील हणेगाव येथील वसंतराव नाईक निवासी आश्रमशाळेत अन्नातून विषबाधा झाल्याची गंभीर घटना घडली आहे. रविवारी (९ ऑगस्ट) रात्रीच्या जेवणानंतर तब्बल ३२ विद्यार्थ्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने मोठा गोंधळ उडाला. मळमळ, उलट्या आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाल्यानंतर सर्व बाधित विद्यार्थ्यांना तातडीने देगलूरच्या उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.
हणेगाव येथील या निवासी आश्रमशाळेत इयत्ता पहिली ते नववीपर्यंतचे विद्यार्थी शिक्षण व निवासासाठी राहतात. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने सायंकाळच्या भोजनात विद्यार्थ्यांना चिकनचा बेत देण्यात आला होता. मात्र, जेवण उरकल्यानंतर रात्री ८ वाजेच्या सुमारास एकापाठोपाठ एक अशा अनेक विद्यार्थ्यांना मळमळणे, उलट्या होणे आणि तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाला. विद्यार्थ्यांची अवस्था पाहून शाळा व्यवस्थापनाची एकच धावपळ उडाली.
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून शाळा प्रशासनाने रात्री १० वाजेच्या सुमारास ३२ विद्यार्थ्यांना देगलूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने तातडीने उपचार सुरू केल्याने सुदैवाने पुढील अनर्थ टळला आणि परिस्थिती नियंत्रणात आली. सध्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर असून, सोमवारी सायंकाळपर्यंत त्यांना डिस्चार्ज दिला जाईल, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. संभाजी पाटील यांनी दिली.
निवासी आश्रमशाळेत प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचा संताप पालकांनी व्यक्त केला आहे. या घटनेची केवळ औपचारिक चौकशी न करता भोजनाचे नमुने, पिण्याचे पाणी, स्वयंपाकघरातील स्वच्छता, चिकनची गुणवत्ता आणि कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी या सर्वांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची आग्रही मागणी संतप्त पालकांकडून केली जात आहे.
