जळगाव प्रतिनिधी, शाकीर शेख.
अंतुर्ली, ता. मुक्ताईनगर (प्रतिनिधी): अंतुर्ली फाटा ते भास्कर देव पेट्रोल पंप आणि पुढे अंतुर्ली गावाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावर वारंवार लहान-मोठे अपघात घडत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. बांधकाम विभागाने तिथे लवकरात लवकर जाऊन पाहणी करावी रस्त्याचे डांबरीकरण करावे अंतुर्ली फाटा ते अंतुर्ली दरम्यान असलेल्या पुलावर खड्डा लवकर भुजण्यात यावा बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष करू नये.

या रस्त्यावरून दररोज ट्रक, अवजड वाहने, चारचाकी व दुचाकींसह मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते. तसेच मध्य प्रदेशाकडे जाणारा महत्त्वाचा मार्ग आणि परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात जाण्यासाठीही हा प्रमुख रस्ता असल्याने दिवसभर वर्दळ असते. मात्र रस्त्यावरील खोल खड्डे व खराब झालेला डांबरी पृष्ठभाग यामुळे अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे.
स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, मुक्ताईनगर यांच्याकडे अनेक वेळा निवेदने देऊन रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
नागरिकांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी. अन्यथा तीव्र लोकआंदोलन छेडण्यात येईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील.
