जळगाव जिल्हा, प्रतिनिधी निलेश खैरनार.
जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित संस्थेच्या नावाने कथित बनावट लेटरहेड, शिक्के व कागदपत्रांचा वापर करून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासह विविध शासकीय कार्यालयांना पत्रव्यवहार केल्याप्रकरणी ॲड. विजय भास्कर पाटील यांच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी सोमवारी दुपारी त्यांच्या राहत्या घरातून त्यांना ताब्यात घेत अटक केली. या कारवाईमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित संस्थेचे मानद सचिव निलेश भोईटे यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, सन २०२३ ते २०२७ या कार्यकाळासाठी निवडून आलेल्या विद्यमान कार्यकारी मंडळाच्या अधिकारांबाबतची बाब धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे प्रलंबित आहे. असे असतानाही स्वतःला संस्थेचे पदाधिकारी असल्याचे भासवून संस्थेच्या नावाने बनावट लेटरहेड, शिक्के आणि कागदपत्रे तयार करण्यात आली. या कागदपत्रांचा वापर करून विविध शासकीय कार्यालयांशी अधिकृत स्वरूपाचा पत्रव्यवहार करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीत नमूद केल्यानुसार, ८ मार्च २०२६ रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील मागासवर्ग कक्षालाही अशाच स्वरूपाची कागदपत्रे पाठविण्यात आली होती. तसेच, या कागदपत्रांच्या प्रती इतर विविध शासकीय कार्यालयांनाही पाठविण्यात आल्याचा आरोप आहे. संबंधित पत्रव्यवहारातून संस्थेच्या अधिकृत प्रतिनिधी असल्याचा आभास निर्माण करून प्रशासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
तक्रार प्राप्त झाल्यानंतर जिल्हापेठ पोलिसांनी प्राथमिक चौकशी करून संबंधित प्रकरणात गुन्हा नोंदविला. त्यानंतर सोमवारी दुपारी ॲड. विजय भास्कर पाटील यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले. आवश्यक चौकशीनंतर त्यांना औपचारिकरीत्या अटक करण्यात आली.
या प्रकरणात बनावट कागदपत्रे तयार करण्यासाठी आणखी कोणाचा सहभाग होता का, तसेच अशा प्रकारचा पत्रव्यवहार आणखी कोणत्या शासकीय कार्यालयांशी करण्यात आला आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. संबंधित कागदपत्रे, शिक्के आणि अन्य पुरावे जप्त करण्याची प्रक्रिया सुरू असून, या प्रकरणातील इतर संबंधितांचीही चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
