जळगांव प्रतिनिधी, मेहरुण, महेश माळी :
लोकसहभाग आणि शाळा–पालक समन्वयाचे प्रेरणादायी उदाहरण ठरत श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे पालक शिक्षक संघटनेकडून शाळेला १० नवीन छतावरील पंख्यांची भेट देण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यालयाच्या भौतिक सुविधांमध्ये मोलाची भर पडली असून विद्यार्थ्यांना अधिक आरामदायी व अनुकूल वातावरणात शिक्षण घेता येणार आहे.

पालक शिक्षक संघटनेच्या सहकार्यामुळे वर्गखोल्यांमध्ये नवीन पंखे बसविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सुविधा व शाळेच्या गुणवत्तावाढीसाठी पालकांनी दिलेले हे योगदान कौतुकास्पद असून, शाळा आणि पालक यांच्यातील सुदृढ भागीदारीचे हे उत्कृष्ट उदाहरण ठरले आहे.
यावेळी मुख्याध्यापक मुकेश सुरेश नाईक यांनी पालक शिक्षक संघटनेचे आभार मानत, विद्यार्थ्यांच्या हितासाठी पालकांनी दिलेले सहकार्य शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. भविष्यातही अशाच लोकसहभागातून शाळेच्या विकासाचे विविध उपक्रम राबविण्यात येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी पालक शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक उपस्थित होते. उपस्थितांनी या उपक्रमाचे स्वागत करत शाळेच्या प्रगतीसाठी पालकांचा सहभाग हीच खरी ताकद असल्याचे मत व्यक्त केले.
