‘विठुरायाच्या दर्शनासाठी चला पंढरपूर’च्या जयघोषाने भुसावळ रेल्वे स्थानक दुमदुमले

जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील (भुसावळ) :
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या हजारो वारकऱ्यांच्या उत्साहाने भुसावळ रेल्वे स्थानक भक्तिमय वातावरणाने भारावून गेले. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या सहकार्याने उपलब्ध झालेल्या विशेष आषाढी रेल्वेने शुक्रवार, २४ जुलै रोजी दुपारी १.३० वाजता भुसावळहून पंढरपूरकडे प्रस्थान केले.

जळगाव, बुलढाणा तसेच परिसरातील विविध भागांतून वारकरी मोठ्या संख्येने भुसावळ रेल्वे स्थानकावर दाखल झाले होते. ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल’, ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात आणि टाळ-मृदंगाच्या गजरात वारकऱ्यांनी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले. यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विशेष रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले.

रावेर लोकसभा मतदारसंघातील खासदारांच्या मागणीनुसार रेल्वे मंत्रालयाच्या सहकार्याने ही विशेष आषाढी रेल्वे उपलब्ध करून देण्यात आली. वारकऱ्यांना प्रवासाची सुविधा मिळावी, यासाठी जनरल तिकिटांची व्यवस्था करून ही रेल्वे सेवा वारकऱ्यांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

विशेष आषाढी रेल्वेचे वेळापत्रक
भुसावळहून प्रस्थान : २४ जुलै २०२६, दुपारी १.३० वाजता
पंढरपूर आगमन : २५ जुलै २०२६, पहाटे ३.३० वाजता
पंढरपूरहून परतीचे प्रस्थान : २५ जुलै २०२६, रात्री १०.३० वाजता
भुसावळ आगमन : २६ जुलै २०२६

यावेळी खासदारांनी वारकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या उत्साहात सहभागी होत आषाढी वारीसाठी शुभेच्छा दिल्या. विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि भक्तिभाव पाहून वातावरण भावूक झाले.

या विशेष रेल्वे सेवेमुळे जळगाव, बुलढाणा आणि परिसरातील वारकऱ्यांना पंढरपूरच्या वारीसाठी मोठी सोय उपलब्ध झाली असून, रेल्वे मंत्रालयाच्या सहकार्याबद्दल वारकरी व भक्तांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

‘चला पंढरपूर… विठुरायाच्या दर्शनासाठी!’
🚩 विठ्ठल नामाचा गजर, पंढरीच्या वाटेवर भक्तीचा सागर! 🙏
