जळगाव (प्रतिनिधी) शाकीर शेख : मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली गावातून जाणाऱ्या मुख्य रस्त्याची दुरवस्था आणि वाढती वाहतूक लक्षात घेता या रस्त्यावर तातडीने दुभाजक (डिव्हायडर) उभारण्यात यावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थ व वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.

अंतुर्ली गावात प्रवेश करताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. एकाच वेळी दोन वाहने समोरासमोर आल्यास वाहतूक कोंडी निर्माण होत असून अपघाताचा धोका वाढत आहे. गावात प्रवेश करताच चिंचोळ्या नाल्यावर संरक्षण जाळी अथवा कठडा नसल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे. तसेच त्या ठिकाणी मोठे खड्डे पडले असून पातोंडी पुलाजवळ, भामदराजवळ तसेच सोसायटी, पोलीस स्टेशन, आंबेडकर चौक, बजरंग चौक ते बेलसवाडीपर्यंत अनेक ठिकाणी रस्ता खड्डेमय झाला आहे.

या रस्त्यावर जिल्हा परिषद शाळा, हायस्कूल, पोलीस स्टेशन, वीज उपकेंद्र, शेतकऱ्यांची सोसायटी, मारुती मंदिर आणि विविध शासकीय कार्यालये असल्याने दिवसभर मोठी वर्दळ असते. विशेषतः शालेय विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना जीव धोक्यात घालावा लागत असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली आहे.

रस्ता चांगला असो वा खराब, अनेक वाहनचालक ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे या मार्गावर यापूर्वीही अनेक अपघात झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. रात्रीच्या वेळी समोरून येणाऱ्या वाहनांच्या तीव्र प्रकाशामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघाताचा धोका अधिक वाढतो.

विवा पेट्रोल पंप ते कृषी सेवा केंद्र पेट्रोल पंप या दरम्यान रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक उभारल्यास विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांच्या समोरासमोर धडकण्याचे प्रकार कमी होतील, वाहतुकीचे योग्य नियोजन होईल, पादचाऱ्यांची सुरक्षितता वाढेल तसेच वाहतूक कोंडीवरही नियंत्रण मिळवता येईल, असे वाहनचालकांचे म्हणणे आहे.

अनेक ठिकाणी पडलेले खड्डे तातडीने बुजवून रस्त्याची दुरुस्ती करावी आणि भविष्यातील अपघात टाळण्यासाठी मुख्य रस्त्यावर दुभाजक उभारण्याचा निर्णय तातडीने घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, रस्ता विकास महामंडळ आणि लोकप्रतिनिधींकडे केली आहे.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!