प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा पोलिसांची कारवाई
जळगाव चोपडा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील.
चोपडा (धुळे): शिरपूर-चोपडा रोडवरील बंद पडलेल्या टोल नाक्याजवळ चोपडा शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने एका इसमाकडून २.१२० किलो गांजा जप्त केला. यासह टीव्हीएस मोटरसायकल व मोबाइल फोनसह एकूण १,०१,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी विजय मुसळ (वय ३५ वर्षे, रा. महादेव दोवाडे, पो. हिसा, ता. शिरपूर, जि. धुळे) यास अटक करण्यात आली. तो शिरपूरहून चोपडाकडे टीव्हीएस कंपनीची मोटरसायकल (क्र. एमएच १८ सी ३१७१) ने गांजाची बेकायदेशीर वाहतूक करत असताना पोलिसांच्या जाळ्यात सापडला.
या कारवाई मध्ये जप्त करण्यात आलेला मुद्देमाल गांजा २.१२० किलो (किंमत २१,२०० रुपये), टीव्हीएस मोटरसायकल: किंमत ७०,००० रुपये, ओप्पो कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल: किंमत १०,००० रुपये अशा स्वरूपाचा आहे.
ही कारवाई चोपडा शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या नेतृत्वात पार पडली. चोपडा विभागाचे एसडीपीओ सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ. महेंद्र पाटील, पो.उपनिरीक्षक सचिन चौधरी, जगदीश चौधरी व इतर कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.
या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत कलम ८(सी), २०(ii)(बी), २२(बी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे (गु.र. नं. ३००/२०२६). आरोपीला १८ जुलै २०२६ रोजी पहाटे २.३६ वाजता अटक करण्यात आली. पुढील तपास पो.उपनिरीक्षक सचिन चौधरी करत आहेत.
