जळगांव प्रतिनिधी, महेश माळी.

मेहरुण : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे संस्थाध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या संकल्पनेतून ‘फकीरा’ वाचन मॅरेथॉन या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविणे, साहित्यप्रेम वाढविणे, चिकित्सक विचारसरणी विकसित करणे तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक व सामाजिक कार्याचा परिचय करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमाची सुरुवात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. त्यानंतर उपशिक्षिका सुवर्णा अंभोरे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याचा, साहित्यसंपदेचा आणि सामाजिक योगदानाचा परिचय करून दिला. त्यांनी विद्यार्थ्यांना समता, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक न्याय आणि शिक्षणाचे महत्त्व त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून समजावून सांगितले.

यानंतर इयत्तानिहाय विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या गाजलेल्या ‘फकीरा’ कादंबरीतील निवडक उताऱ्यांचे सलग वाचन केले. प्रत्येक विद्यार्थ्याने निश्चित वेळेत वाचन करत त्या उताऱ्याचा आशयही आपल्या शब्दांत मांडला. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या वाचन कौशल्याबरोबरच आकलनशक्ती, अभिव्यक्ती, आत्मविश्वास आणि संवादकौशल्यालाही चालना मिळाली.

यावेळी ‘फकीरा’, वारणेचा वाघ पाझर ‘वैजयंता’, ‘माझी मुंबई’ यांसह अण्णाभाऊ साठे यांच्या विविध साहित्यकृतींची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. त्यांच्या साहित्यामधून सामाजिक परिवर्तन, मानवी मूल्ये, संघर्षशील जीवन आणि समतेचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात आला.

मुख्याध्यापक मुकेश सुरेश नाईक यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) विद्यार्थ्यांमध्ये वाचन, आकलन आणि विचारशक्ती विकसित करण्यावर भर देते. ‘फकीरा’ वाचन मॅरेथॉनसारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची सवय रुजते, भाषिक कौशल्य विकसित होते आणि सामाजिक मूल्यांची जाणीव निर्माण होते. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य विद्यार्थ्यांना संघर्षातून यश मिळविण्याची प्रेरणा देते.”

कार्यक्रमास पर्यवेक्षिका शितल कोळी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या उत्साहाने उपस्थित होते. उपक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी “दररोज वाचू, नवे शिकू आणि सुजाण नागरिक घडू” अशी सामूहिक वाचन प्रतिज्ञा घेतली.

संस्थाध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे पालकांनीही कौतुक केले. विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती जोपासणारा, साहित्याविषयी आत्मीयता निर्माण करणारा आणि सामाजिक जाणिवा समृद्ध करणारा हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!