जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार.

जळगाव महानगरपालिकेअंतर्गत शहरातील स्वच्छता व घनकचरा संकलनाचे काम करणाऱ्या बीव्हीजी कंपनीतील घंटागाडी चालक, कचरा संकलन कर्मचारी आणि महिला सफाई कर्मचाऱ्यांनी रखडलेल्या पगाराच्या निषेधार्थ आजपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. वेळेवर वेतन न मिळाल्याने संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी “पगार मिळाल्याशिवाय कोणतेही काम करणार नाही” असा ठाम निर्णय घेतला आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात जळगाव शहरातील स्वच्छता व्यवस्थेवर मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जळगाव शहरातील घराघरातील कचरा संकलन आणि रस्त्यांची साफसफाई करण्याची जबाबदारी बीव्हीजी कंपनीकडे आहे. कंपनीच्या माध्यमातून सुमारे १०० घंटागाड्या शहरात कार्यरत असून, शेकडो कर्मचारी या कामात गुंतलेले आहेत. मात्र, कर्मचाऱ्यांचे वेतन रखडल्याने त्यांनी कामबंद आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.

आंदोलनादरम्यान कर्मचाऱ्यांनी प्रकल्प व्यवस्थापनावर गंभीर आरोप केले. प्रकल्प व्यवस्थापकांकडून कर्मचाऱ्यांवर दबाव टाकला जात असून, कचऱ्याचे वजन वाढवण्यासाठी त्यामध्ये माती किंवा दगड टाकण्यास सांगितले जाते, असा आरोप त्यांनी केला. “आम्हाला वजन हवे, कसेही करून वाढवा,” असे ठेकेदारीच्या माध्यमातून सांगितले जात असल्याचा दावा कर्मचाऱ्यांनी केला आहे.

या आरोपांमुळे स्वच्छता व्यवस्थेच्या कामकाजाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र, या आरोपांवर प्रकल्प व्यवस्थापनाकडून स्वतंत्र प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, महिनोनमहिने प्रामाणिकपणे काम करूनही वेळेवर वेतन मिळत नसल्याने त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. घरखर्च, मुलांचे शिक्षण, बँक कर्जाचे हप्ते आणि दैनंदिन गरजा भागवताना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने त्यांनी आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, बीव्हीजी कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक विनोद रेड्डी यांनी दोन दिवसांत रखडलेले पगार अदा करण्यात येतील, असे आश्वासन दिले आहे. मात्र, जोपर्यंत पगार प्रत्यक्ष खात्यात जमा होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

या कामबंद आंदोलनामुळे शहरातील कचरा संकलन आणि साफसफाईची कामे ठप्प होण्याची शक्यता असून, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात कचऱ्याचे ढीग साचून अस्वच्छता व आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!